पाकने केली ३१ भारतीय मच्छिमारांना अटक - Marathi News 24taas.com

पाकने केली ३१ भारतीय मच्छिमारांना अटक

www.24taas.com, इस्लामाबाद
 
पाकिस्तानी सामुद्रिक सुरक्षा एजन्सीने ३१ भारतीय मच्छिमारांना अटक केली तसंच १४ बोटीही जप्त केल्या. पाकिस्तानच्या सामुद्रिक हद्दीचा भंग केल्याच्या कारणावरुन ही कारवाई केल्याचं पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितलं.
 
पाकिस्तानच्या मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सी म्हणजेच एमएसए गस्त घालत असताना या मच्छिमारांनी पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी सामुद्रिक हद्दीत ११० नॅटिकल मैल घुसखोरी केल्याने ३१ मच्छिमारांना अटक आणि १४ बोटी जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
 
पाकिस्तानच्या सामुद्रिक हद्दीत मोठ्या प्रमाणावर मासे मिळत असल्याने भारतीय मच्छिमार सातत्याने घुसखोरी करतात आणि त्यामुळे पाकिस्तानी स्थानी मच्छिमारांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम होत असल्याचं दावा या अधिकाऱ्याने केला. पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीने या मच्छिमारांना कराची पोलिसांच्या ताब्यात दिलं.
 
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या सामुद्रिक हद्दींचा भंग केल्याच्या कारणावरुन दरवर्षी अनेकांना पकडण्यात येते. मागच्या वर्षी एकाच वेळी केलेल्या मोठ्या कारवाईत एमएसएने १२२ भारतीय मच्छिमारांना अटक आणि २३ मासेमारी करणाऱ्या बोटी जप्त केल्या होत्या.
 
मागच्या महिन्यात पाकिस्तानने कारवासाची शिक्षा पूर्ण केलेल्या १७९ भारतीय मच्छिमारांची मुक्तता केली होती. पाकिस्तानच्या कारागृहात अद्यापही ३६० भारतीय मच्छिमार अटकेत आहेत.
 
 

First Published: Monday, January 23, 2012, 00:48


comments powered by Disqus