Last Updated: Tuesday, January 31, 2012, 13:01
www.24taas.com , शिकागो अमेरिकेने आउटसोर्सिंग बंद केल्यास भारताकडे येणारा कामाचा ओघ थांबेल. त्याचे दुष्परिणाम अमेरिका आणि भारत या देशांच्या अर्थव्यवस्थांना भोगावे लागतील. याची भिती भारताचे केंद्रीय अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिका भारतामध्ये होणारे कामाचे आउटसोर्सिंग बंद करेल, अशी सध्या भीती आहे. प्रत्येक देश गरजेनुसार अंतर्गत धोरणे आखण्यास मोकळा जरी असला तरी फक्त आपल्या देशाचे हित सांभाळण्याचा कल असू नये, असे मतही प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे वस्तुंचा आणि सेवांचा प्रवाह विना-अडथळा जगभर व्हायला हवा यावर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनही काम करत असल्याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले आहे.
अमेरिकेमध्ये नोक-या निर्माण करणा-या कंपन्यांना देशाच्या बाहेर काम पाठवणा-या (आउटसोर्सिंग) कंपन्यांच्या तुलनेत जास्त कर सवलती मिळतील असे उद्गार अध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच काढले होते. ओबामा यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेत मुखर्जी यांनी हे भाष्य केलं आहे. वस्तू व सेवांची देवाणघेवाण जगभरात अत्यंत सुलभरीतीने होणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये येणारे अडथळे काढून टाकले पाहिजेत आणि अशा प्रकारच्या धोरणांचा चांगला फायदा झाल्याचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, असेही त्यांनी सांगितले.
First Published: Tuesday, January 31, 2012, 13:01