मुशर्रफना रेड कॉर्नर नोटीस? - Marathi News 24taas.com

मुशर्रफना रेड कॉर्नर नोटीस?

www.24taas.com,  इस्लामाबाद  
 
 
पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्या अटकेसाठी इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी, यासाठी आवश्यक त्या प्रस्तावांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने संमती दिली असल्याची माहिती गृहमंत्री रहमान मलिक यांनी दिली.
 
 
पाकच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या या संमतीचा प्रस्ताव फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे पाठविण्यात आला असून येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडून इंटरपोलला तसे पत्र पाठविण्यात येईल, अशी आशा मलिक यांनी व्यक्त केली. न्यायालयाने जारी केलेल्या आदेशान्वये एफआयए प्रमुखांनी मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. यापूर्वी एफआयएच्या दहशतवादविरोधी विभागाने गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते. इंटरपोलने मुशर्रफ यांना अटक करण्यासाठी आवश्यक ती रेड कॉर्नर नोटीस जारी करावी म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी विनंती गृहमंत्रालयाला एफआयएनेच केली होती.
 
 
मुशर्रफ हे सध्या लंडन आणि दुबईमध्ये विजनवासात आहेत. माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना पुरेशी सुरक्षा यंत्रणा पुरविण्यात मुशर्रफ यांना अपयश आले आणि त्यांची हत्या झाली होती. यामुळे मुशर्रफ यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यानंतर मुशर्रफ यांना पुन्हा पाकिस्तानात आणले जाईल व न्यायालयासमोर उभे केले जाईल, असे मलिक यांनी अलीकडेच सांगितले होते.
 
 
दरम्यान,  मुशर्रफ यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केला  होता. पाकिस्तानात न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडू, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याने मुशर्रफ पाकमध्ये आलेले नाहीत.

First Published: Thursday, March 1, 2012, 13:55


comments powered by Disqus