मुंबई - शांघाय मैत्रीचा धागा - Marathi News 24taas.com

मुंबई - शांघाय मैत्रीचा धागा

www.24taas.com, नवी दिल्ली
 
भारत-चीन या देशांतील प्रमुख शहरांमध्ये मैत्री करार करण्याच्या प्रस्तावाला गुरूवारी मान्यता देण्यात आली. यामुळे मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरू होणार आहे. मैत्री  अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. ही मैत्री प्रामुख्याने मुंबई आणि शांघाय या शहरांमध्ये दिसणार  आहे.
 
 
मुंबई -शांघाय तसेच बंगळूर - कुनमिंग या शहरांमध्ये मैत्रीचा धागा बांधण्यात येणार आहेत. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि चीनचे परराष्ट्रमंत्री यांग जियेचि यांच्यात झालेल्या वाटाघाटींमध्ये इतर विविध प्रस्तावांबरोबर या कल्पनेलाही मान्यता देण्यात आली. मार्चअखेरीस होणाऱ्या ब्रिक्‍स (ब्राझील-रशिया-इंडिया-चायना-साऊथ आफ्रिका) राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या पूर्वतयारीसाठी चिनी परराष्ट्रमंत्री मुख्यतः दिल्लीत होते. त्यानिमित्त त्यांनी कृष्णा यांच्याबरोबर शिखर परिषदेबरोबरच द्विपक्षीय संबंधांच्या इतर मुद्यांवरही चर्चा केली.
 
झी टीव्हीचे चीनमध्ये पाऊल
वर्तमान वर्ष हे 'भारत-चीन मैत्री व सहकार्य वर्ष' म्हणून साजरे करण्याचे ठरले आहे. यात उभय देशांतील शहरांमध्ये मैत्रीकरार करण्याची कल्पना पुढे आली. 'झी टीव्ही'ला चीनमध्ये प्रसारणाची परवानगी देण्यात आली आहे. माहिती-तंत्रज्ञान व औषधनिर्मिती उद्योग या दोन्ही क्षेत्रांत भारत व चीन समान पद्धतीने काम करू शकतील, असे भारतातर्फे प्रतिपादन करण्यात आले. चीनमधील औद्योगिक मेळाव्यांमध्ये भारताने सहभाग वाढवावा, असे चीनतर्फे सुचविण्यात आले आहे. मुंबई-शांघाय मैत्रीकरार हा मुख्यतः दोन्ही देशांमध्ये होणार आहे, असे पूर्व विभागाचे सहसचिव गौतम बंबावाले यांनी सांगितले.
 
 
हैनान येथे मार्चमध्ये होणाऱ्या बोआओ फोरम फॉर आशियाच्या (बीएफए) बैठकीसाठी योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया देशाचे प्रतिनिधित्व करतील, असे भारतातर्फे सांगण्यात आले.  जानेवारीत दोन्ही देशांमधील  प्रतिनिधींची सीमातंट्याबाबत चर्चा झाली होती. त्यात सीमेवर शांततापालनासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे ठरविण्यात आले होते. त्यासंदर्भातही पुढील आठवड्यात चीनमध्ये बैठक होणार आहे.
 
 
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्र नदीचे पात्र कोरडे पडले. या नदीचे पाणी अन्यत्र वळविण्यास चीन कारणीभूत असल्याच्या वृत्ताचे चीन परराष्ट्र विभागाच्या प्रवक्‍त्यांनी खंडन केले. चीनने ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अन्यत्र वळविले नाही. त्याची खातरजमा करून घेण्यात आल्याचे पूर्व विभागाचे सहसचिव गौतम बंबावाले यांनी सांगितले.

First Published: Friday, March 2, 2012, 16:10


comments powered by Disqus