पाकमध्ये हिंदू मुलींच्या धर्मांतरात वाढ - Marathi News 24taas.com

पाकमध्ये हिंदू मुलींच्या धर्मांतरात वाढ

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
पाकिस्तानमध्ये काही राज्यात भेदभाव केला जातो, तर काही ठिकाणी याला विरोध केला जात आहे. यामध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदू मुलींना पळवून नेऊन, त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, असा दावा अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमन यांनी केला आहे.
 
 
पाकिस्तानमध्ये गेल्या फेब्रुवारी महिन्यात रिंकेल कुमारी या मुलीचे अपहरण करुन नवीद शहा या तरुणाशी लग्न लावण्यात आले. याप्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असुन यामध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) लोकप्रतिनिधीचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांना कडक शब्दात सुनावले आहे.
 
 
रिंकेलला धमकावून दिवाणी कोर्टात हजर आले होते, जर तोंड उघडले तर तिला आणि तिच्या कुटुंबियांची हत्या करण्यात येईल असे सांगितले होते. तसेच, स्वखुशीने धर्मांतर करत आहे, असा जबाब देण्यासाठी दबाब तिच्यावर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
सिंध प्रांतात दर महिन्याला सरासरी अशी २० ते २५ हिंदू मुलींची धर्मांतरे जबरदस्तीने केली जातात. याप्रकरणी अमेरिकेतील सिंधी अमेरिकन पोलिटिकल अॅक्शन कमिटीने(एसएपीएसी) हे प्रकरण अमेरिकेत अनेक लोकप्रतिनिधी मंडळींच्या लक्षात आणून दिले. यावर झरदारी यांना ब्रॅड शेरमन यांनी कडक शब्दात पत्र पाठविले आहे, असे एशियन ह्युमन राइट्स कमिशनने म्हटले आहे.

First Published: Friday, March 16, 2012, 00:00


comments powered by Disqus