Last Updated: Tuesday, November 15, 2011, 08:30
झी २४ तास वेब टीम, पुणे 
समस्त पुणेकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे पुणेकर व्यक्तीने. एका पुणेकरानं केलेल्या संशोधनापुढे चीन झुकला. कागदाचा शोध चीनमध्ये नव्हे तर भारतात लागल्याचं पुण्यातल्या प्रभाकर गोसावींनी सिद्ध केलं. विशेष म्हणजे चीननंही हे मान्य करत आपण कागदाचे इनव्हेन्टर नव्हे तर डेव्हलपर असल्याचं स्पष्ट केलं.
कागद या एकाच विषयावर आय़ुष्यभर काम करणारे प्राध्यापक प्रभाकर गोसावी. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी एक महत्त्वाचं संशोधन पुढे आणलं. कागदाचा शोध चीननं लावला, असा आजवरचा समज खोडून काढत कागदाचा शोध पहिल्यांदा भारतातच लागल्याचं गोसावी यांनी सिद्ध केलं. भारतामध्ये इ.स. पूर्व ३२७ पासून कागदाचा वापर सुरु होता. लंडनच्या ब्रिटीश लायब्ररीत हा कागद आणि त्याचे पुरावे मिळाल्याचं गोसावी यांचं म्हणणं आहे.
इंटरनॅशनल पेपर्स असोसिएशनच्या वतीनं गोसावी यांचं हे संशोधन प्रसिद्धही करण्यात आलं. त्यांचं हे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर चीननं कागदाचा शोध लावल्याचा त्यांचा दावा तीनशे वर्षांनी मागे घेतला.ब्रिटीश लायब्ररीत असलेल्या सांगोडियन पत्रांवरुन गोसावी यांनी कागदाचा शोध भारतात लागल्याचं म्हंटलं. त्यामुळे सांगोडियन पत्रांचं संशोधन व्हावं आणि या महत्त्वपूर्ण शोधावर भारताचं नाव कोरलं जावं यासाठी सरकारनंही प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा गोसावी यांनी व्यक्त केली.
First Published: Tuesday, November 15, 2011, 08:30