Last Updated: Friday, March 23, 2012, 17:20
www.24taas.com, लाहोर पाकिस्तानातील एका संघटनेने अशी मागणी केली आहे की स्वातंत्र्य सेनानी भगत सिंग यांचा देशात (पाकिस्तानात) योग्य रितीने सन्मान व्हावा. भगत सिंग यांचा लढा कुठल्याही एका विशिष्ट प्रांत, धर्म, भाषा, जात यासाठी नव्हता. त्यांचा लढा हुकुमशाही, अन्याय यांच्याविरोधात होता. अशा लढ्याला कोणत्याही सीमेचे बंधन असू शकत नाही.
भगत सिंग यांना लाहोर येथेच फाशी देण्यात आले होते. या स्थळावर शहीद भगत सिंग यांचे स्मारक बांधावे यासाठी 'वर्ल्ड पंजाब काँग्रेस' गेली २० वर्षं प्रयत्न करत असल्याचे वर्ल्ड पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष फाखर जामन यांनी सांगितले.
भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन क्रांतीकारकांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आले होते. हे ठिकाण आज शादमान चौक या नावाने ओळखलं जातं. या स्थळाला शहीद भगत सिंग हे नाव देण्यात यावे, अशी इच्छा जामन यांनी व्यक्त केली आहे.
जामन म्हणाले, “पंजाबच्या या महानायकाला श्रद्धांजली देण्यासाठी ये स्थळावर स्मारक बांधलं जावं.” भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये शांतता आणि मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करू पाहाणाऱ्या संस्था या कामासाठी मदत करतील अशी जामन यांना आशा आहे. भारत सरकारनेही यासाठी प्रयत्न करावेत, अशी इच्छा जामन यांनी व्यक्त केली आहे.
First Published: Friday, March 23, 2012, 17:20