लंडन ऑलिम्पिकवर सायनाईड हल्ला चढवण्याचा कट? - Marathi News 24taas.com

लंडन ऑलिम्पिकवर सायनाईड हल्ला चढवण्याचा कट?

www.24taas.com, लंडन

ब्रिटन लंडन ऑलिम्पिकसाठी सज्ज होत असताना अल कायदाशी संबंधित काही धर्मांध माथेफिरू सायनाईडच्या हल्ला चढवण्याची योजना आखत असल्याचं वृत्त आहे.अल कायदाशी धागेदोरे असलेल्या एका वेबसाईटवर कट्टरपथीयांनी ऑलिम्पिक दरम्यान भयावह हल्ला चढवण्यासंदर्भात तपशीलवार सूचना पोस्ट केल्याचं वृत्त सन या वर्तमानपत्राने दिलं आहे.
 
अल कायदाच्या दोन अतिरेक्यांची जेलमधून लवकर मुक्तता केल्यानंतर हा ऑनलाईन कट उघडकीस आला आहे. वेबवर सायनाईड संहारासंबंधीच्या पोस्ट केलेल्या माहितीसंदर्भात सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने विचार करणं आवश्यक असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अबु हिजा अन्सारी नावाच्या अतिरेक्याने हल्ला चढवताना सायनाईड आणि हँडक्रिम यांचे मिश्रण केल्याने ते त्वचा शोषून   घेईल अशा प्रकाराच्या सूचनाही दिल्या आहेत.
 
अरेबिक भाषेत लिहिलेल्या या सूचनांमध्ये स्कीन क्रिममुळे त्वचेच्या छिद्रातून सायनाईड शोषलं जाईल आणि त्याने परिणामकारकता वाढेल असंही नमुद केलं आहे. कटाची अंमलबजावणी करणाऱ्यांनी मेडिकल ग्लोव्हज घालावेत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. लंडनमध्ये जुलै २७ ते ऑगस्ट १३ दरम्यान ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे.

First Published: Monday, March 26, 2012, 23:11


comments powered by Disqus