आण्विक दहशतवादाचा धोका - पंतप्रधान - Marathi News 24taas.com

आण्विक दहशतवादाचा धोका - पंतप्रधान

www.24taas.com, सेऊल
 
जगाला आण्विक दहशतवादाचा धोका आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. ते अणु शिखर परिषदेत बोलत होते.
 
 
आण्विक दहशतवाद आणि अणुतंत्रज्ञानाचा गुप्त प्रसार हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका बनला आहे. भारत या धोक्याबद्दल अतिशय सतर्क आहे. जग अण्वस्त्रांपासून मुक्त होणे हीच अणुसुरक्षेसाठी सर्वात मोठी हमी ठरेल. दहशतवाद्यांचा अणुसामुग्री आणि तंत्रज्ञानापर्यंत पोहोचण्याचा जोपर्यंत प्रयत्न सुरू राहील, तोपर्यंत आण्विक दहशतवाद आणि गुप्त प्रसाराचा मोठा धोका कायम राहील, अशी चिंता  मनमोहन सिंग यांनी  व्यक्त केली.
 
 
संहारक शस्त्र दहशतवाद्यांच्या हाती पडू नये यासाठी भारताने २00२ मध्ये आणलेला प्रस्ताव एकमताने पारित झाला होता, याचे स्मरणही त्यांनी करवून दिले. रासायनिक, जैविक तसेच किरणोत्सारी सामुग्री अन्य घटकांपर्यंत पोहोचू नये यासाठी कायदेशीर उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याची तरतूद या प्रस्तावात आहे. अणुसामुग्री आणि तंत्रज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी दहशतवादी प्रयत्नरत राहतील तोपर्यंत आण्विक दहशतवादाचा धोका कायम असेल.
 
 
राजीव गांधी यांनी किमान २५ वर्षांपूर्वी आणलेल्या कृती अहवालाचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. २00५ मध्ये त्यात करण्यात आलेली सुधारणा पाहता भारताने सकारात्मकच भूमिका अवलंबली आहे. अणु दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी आजवर झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारत भागीदार राहिला आहे. दिल्लीत एक परिषदही भारताने आयोजित केली होती, याकडे डॉ. सिंग यांनी लक्ष वेधले.

First Published: Wednesday, March 28, 2012, 16:01


comments powered by Disqus