Last Updated: Wednesday, April 11, 2012, 11:40
www.24taas.com, इस्लामाबाद पाकिस्तानी विदेश मंत्री हिना रब्बानी खार यांना पदच्युत करण्याची कुठलीही योजना नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारने दिला आहे. काश्मिर प्रकरणी पाकिस्तानी पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष यांच्या वक्तव्याचा विरोधाभास करणारं वक्तव्य केल्याबद्दल हिना रब्बानी यांना पदच्युत केलं जाणार असल्याची चर्चा होती. ही चर्चा निराधार असल्याचं पाकिस्तानच्या सरकारी प्रवक्त्याचं म्हणणं आहे.
पंतप्रधान गिलानी यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून या अफवा पसरवण्यात येत असल्याचं पंतप्रधान निवासाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. विभागात काही बदल करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं असलं, तरी त्याचा हिना रब्बानींवर काही परिणाम होणार नाही. पंतप्रधानांचं नवी टीम बनवणार असल्याचं वक्तव्य नवे विदेश सचिव जलील अब्बास जिलानी आणि भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्त सलमान बशीर यांच्या संदर्भात होतं.
चार एप्रिल रोजी हिना रब्बानी यांनी एका सार्वजनिक सभेत राष्ट्रपती झरदारी यांच्या वक्तव्याचा विरोधाभास निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. यामुळे अमेरिकेचे उप सहाय्यक विदेश मंत्री थॉमस नाइड्सदेखील हैराण झाले होते, असं सांगण्यात येत आहे. याच कारणांमुळे हिना रब्बानी यांना पदावरून काढण्यात येण्याची शक्यता असल्याची चर्चा होती.
First Published: Wednesday, April 11, 2012, 11:40