लादेननंतर अमेरिकेचे टार्गेट जवाहिरी - Marathi News 24taas.com

लादेननंतर अमेरिकेचे टार्गेट जवाहिरी

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
अमेरिकेला हादरा देणाऱ्या अल कायदाचा मोरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा केल्यानंतर अल कायदाचा नवीन म्होरक्या अयमान अल जवाहिरी याला संपविण्याचा विडा अमेरिकेने उचलला आहे.पाकिस्तानच्या आदिवासी भागात असलेल्या जवाहिरीला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्यात येईल, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे सल्लागार जॉन ब्रेनान यांनी म्हटले आहे.
 
 
अरेबियन भागातही काही दहशतवादी कमांडर दडून बसलेले आहेत. त्यांचाही शोध घेण्याचे काम केले जात आहे. गत वर्षी अबोटाबादमध्ये अमेरिकेच्या सुरक्षा दलाकडून गुप्त कारवाई करण्यात आली होती. त्यात अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खात्मा करण्यात आला होता. लादेनच्या मृत्यूनंतर दहशतवाद्यांच्या कारवायांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात अमेरिकेला यश आले. परंतु लादेननंतर जवाहिरीची म्होरक्या म्हणून निवड करण्यात आल्याने पुन्हा दहशतवादाने डोके वर काढले आहे.
 
 
अमेरिकेच्या विरूद्ध पुन्हा अल कायदाने हालचाली सुरु केल्याने अमेरिकेने जवाहिरीला शोधण्याची ही प्रतिज्ञा केली आहे. लादेन ठार झाल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ब्रेनान बोलत होते. दरम्यान, उत्तर वझिरीस्तानमध्ये ९ फेब्रुवारी २०१२ रोजी अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेल्या बद्र मन्सूर या अल कायदाच्या म्होरक्याचा तो साथीदार होता.
 
 

First Published: Tuesday, May 1, 2012, 18:35


comments powered by Disqus