ओबामांची भारतविरोधी जाहिरातबाजी! - Marathi News 24taas.com

ओबामांची भारतविरोधी जाहिरातबाजी!

www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळीने आता जोर धरला असून भारतीय स्टाइलने अमेरिकेतही आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे मीट रॉम्नी यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत त्यांनी भारत द्वेषाचा वापर केला आहे.
 
रॉम्नी यांच्या भारत प्रेमावर टीका करत ओबामा यांनी अमेरिकी जनतेला आकर्षित करायला सुरूवात केली आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल ७८० हजार डॉलर खर्च करण्याचे ठरविले आहे.
रॉम्नी हे मॅसेच्युसेट राज्याचे राज्यपाल असताना त्यांनी अमेरिकेतील कामे भारतीयांना 'आउटसोर्स' केली होती. कॉपोर्रेट क्षेत्रात सीइओपदी काम करताना रॉम्नी यांनी अमेरिकेतील कामे चीन आणि मेक्सिको या देशांना आउटसोर्स केली. अशा रॉम्नींना तुम्ही निवडून देणार का? अस प्रश्न या जाहिरातीत करण्यात आला आहे.
 
भारतीयांविरुद्ध मोहीम चालवून जनमत आपल्या बाजूने वळविण्याची खेळी ओबामा करत आहेत. ही जाहिरात व्हजिर्निया, ओहायो, लोवा या राज्यांत दाखविली जाणार आहे. ज्या व्यक्तीचे स्वीस बँकेत खाते आहे अशा व्यक्तीला तुम्ही अमेरिकेचा अध्यक्ष करणार का? अशी भावनिक सादही ओबामांनी या जाहिरातीतून घालत आहेत.
 
अमेरिकेतील बहुतांश कंपन्या आपले बॅक ऑफिसचे काम भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना आउटसोर्स करतात त्यामुळे भारतीय कंपन्यांना ६० टक्के महसूल मिळतो.

First Published: Friday, May 4, 2012, 17:00


comments powered by Disqus