Last Updated: Friday, May 11, 2012, 13:46
www.24taas.com, नवी दिल्ली पाकिस्तानात जाण्यापुर्वी पाच लाख रूपये अनामत रक्कम जमा करा आणि पाकिस्तानात जा, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानी नागरिक मोहम्मद खलील चिस्ती यांना दिला आहे. त्यामुळे त्यांचा पाकमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद खलील चिस्ती यांना पाकमध्ये जाण्यास परवानगी दिली आहे. पाकिस्तानात जाण्यापूर्वी उच्चायुक्ताकडे पाच लाख डिपॉझिट जमा करण्यात य़ावे. तसेच १ नोव्हेंबर २०१२ पूर्वी भारतात परत यावे, अशी अट न्यायालयाने चिस्तींना घातली आहे. डॉ. चिस्ती हे १९९५ पासून राजस्थानमधल्या अजमेर जेलमध्ये आहेत.
चिस्ती यांना एका हत्येप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. ८२ वर्षीय चिस्ती यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान चिस्तींनी भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार मानताना सांगितले की, पाक सरकारनेसुद्धा भारतीय कैद्यांना सोडावे.
First Published: Friday, May 11, 2012, 13:46