`त्या` दोघींनी पेटवून दिले १७ लाख रुपये!, Two sisters burn Rs1.7m in cash

`त्या` दोघींनी पेटवून दिले १७ लाख रुपये!

`त्या` दोघींनी पेटवून दिले १७ लाख रुपये!

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

तुमच्या हातात जर एकदम लाखो रुपये मिळाले तर... तर, नक्कीच तुम्ही त्याला आग लावणार नाहीत. पण, पाकिस्तानातील दोन बहिणींनी मात्र हे करून दाखवलंय. त्यांनी चक्क १७ लाख रुपये पेटवून दिले.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणाऱ्या दोन बहिणींनी आपल्या अकाऊंटमधून १७ लाख रुपये काढून त्याला आग लावून दिलीय. झेलम जिल्ह्यातील बिलाल टाऊन भागातील ही घटना आहे.
जिल्हा पोलीस अधिकारी अफजल बट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाहीद (४०) आणि रुबिना (३५) या आपल्या फिक्स्ड डिपॉझिट अकाऊंटमधून १७ लाख रुपये काढण्यासाठी ‘नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान’च्या एका ब्रांचमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी मॅनेजरनं काही कारणं देत त्या दोन्ही बहिणींना त्यांची ही मागणी तात्काळ पूर्ण होऊ शकत नसल्याचं सांगितलं.

यानंतर या दोघी बहिणी बुधवारी पुन्हा एकदा त्याच ब्रांचमध्ये गेल्या आणि मॅनेजरकडे आपले पैसे मागितले. दुपारपर्यंत या दोन्ही बहिणींकडे बँकेकडून पैसे सोपवले गेले. तेव्हा या दोघींनी नोटा घेऊन बँकेच्या दरवाज्यातून बाहेर पाऊल टाकलं... आणि बघता बघता या दोघींनी पैशांना सर्वांदेखत आग लावून दिली.

जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पैसे जाळताना पाहिलं तेव्हा त्यांनी या दोघा बहिणींना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकीनं पिस्तूल दाखवून लोकांना रोखून धरलं. ‘हे पैसे आमचे आहेत आणि त्याचं जे काही करायचंय ते करण्याचा आम्हाला अधिकार आहे’ असं म्हणत त्यांनी हे पैसे जाळून टाकले. काही वेळानंतर इथं पोलीस दाखल झाले.

दोन्ही बहिणींनी एक वर्षापूर्वी वडिलोपार्जित संपत्तीच्या स्वरुपात मिळालेले २८ लाख रुपये बँकेत जमा केले होते. या दोन्ही बहिणींचं अद्याप लग्न झालेलं नाही. त्यांना दोन भाऊही आहेत पण त्या भावांपासून वेगळ्या राहतात. त्यांच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कुटुंबातील सर्वच बहिण – भाऊ मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 11, 2014, 11:37


comments powered by Disqus