'माला-डी' नव्हे फक्त माळ - Marathi News 24taas.com

'माला-डी' नव्हे फक्त माळ

झी २४ तास वेब टीम, मुंबई
कुटुंब नियोजनासाठी सायकलबीड्स रंगीत मण्यांची माळ वापरणे ही एक अत्यंत अनोखी पध्दत एचएलएल लिमिटेडने शोधून काढली आहे.सायकलबीड्सचा वापर ही एक अत्यंत सुलभ, किफायतशीर अशी पध्दत आहे. एचएलएल ही देशातील सर्वात मोठी कडोंम उत्पादक कंपनी आहे. आता दररोज कोणतीही गोळी घेण्याची गरज नाही फक्त माळेतले मणी मोजले की झाले.
 
स्त्रिच्या मासिक पाळीचे दिवस दर्शवणारी रंगीत मण्यांची माळ या कंपनीने तयार केली आहे. मासिक पाळी दरम्यानचा प्रत्यके दिवसासाठी फक्त माळेतील मण्यावर रिंग पुढे सरकवली की झाले. मण्याच्या रंगावरुन कोणत्या दिवशी गर्भधारणा होऊ शकते हे स्त्रीला कळू शकते. या माळेची किंमत फक्त पन्नास रुपये आहे. जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या संशोधकांनी ही माळ विकसीत केली आहे.
 
सायकलबीड्स ही स्टँडर्ड डे मेथडवर आधारीत आहे आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी उत्यंत प्रभावी अशी पध्दत आहे. साधारणता २६ ते ३२ दिवसांनंतर मासिक पाळी येणाऱ्या स्त्रीयांसाठी ही पध्दत विकसीत करण्यात आली आहे. स्त्रीने मासिक पाळीची सुरवात झाली की लाल रंगाच्या मण्यावर रबराची रिंग सरकवायची आहे. आणि नंतर प्रत्येक दिवसासाठी रिंग एक मणी पुढे सरकवत न्यायची. जर रिंग लाल किंवा गडद रंगाच्या मण्यावर असेल तर त्यादिवशी गर्भधारणेची शक्यता कमी आहे आणि समागमासाठी दिवस सुरक्षित आहे. जर रिंग पांढऱ्या मण्यावर असेल तर त्यादिवशी गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक आहे आणि शरीरसंबंध ठेवताना काळजी घेणं आवश्यक आहे.
 
या पध्दतीमुळे महिलांच्या सक्षमीकरणा बरोबरच कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागातही वाढ होते. सायकलबीडस उपलब्ध करुन देणारं झारखंड हे देशातील पहिलं राज्य असून जवळपास ४०,००० महिला त्याचा लाभ घेताहेत.

First Published: Monday, January 9, 2012, 17:38


comments powered by Disqus