Last Updated: Monday, January 16, 2012, 23:50
www.24taas.com, कौलालंपुर 
मलेशिया जगातील सर्वाधिक कंडोम निर्माता देश म्हणून उदयाला येण्याची शक्यता एका आघाडीच्या रबर उद्योगातली एजन्सीने वर्तवली आहे. सध्या कंडोम उत्पादनात थायलंड जगात प्रथम क्रमांकावर आहे.मलेशियाने जागतिक उत्पादनात एक तृतियांश हिस्सा काबीज केल्याचं मलेशियन रबर एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिलने म्हटलं आहे.
आम्ही थायलंडला मागे टाकून जगातील आघाडीचे कंडोम उत्पादक होऊ शकतो. मागच्या वर्षी आम्ही बिलियन कंडोम उत्पादनाचा आकडा सहजपणे पार केला असं काऊन्सिलचे मार्केटिंग आणि डेव्हलपमेंट संचालकांनी सांगितलं. मागच्या वर्षी पुराच्या तडाख्याने थायलंडला फटका बसला होता. जगातील चवथ्या क्रमांकाचे नैसर्गिक रबर उत्पादक देश असलेल्या मलेशियाने २००५ च्या तुलनेत मागील वर्षी तिपट्टीने निर्यात केली होती. जागतिक बाजारपेठेत कंडोम उत्पादनात थायलंड, चीन, भारत, जपान आणि मलेशिया हे आघाडीचे देश आहेत. दरवर्षी हे देश १० बिलियन कंडोमचे उत्पादन करतात. मलेशियन कंडोमना अतिशय चांगली मागणी आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जातो. कंडोम उत्पादन नैसर्गिक रबरवर अवलंबून असतं आणि त्यात मलेशिया अग्रेसर आहे.
First Published: Monday, January 16, 2012, 23:50