Last Updated: Wednesday, May 16, 2012, 17:29
www.24taas.com, अकोला पाणी टंचाईचे तीव्र पडसाद अकोला महापालिकेत उमटलेत. पाणी टंचाईवर बोलावण्यात आलेल्या महापालिकेच्या विशेष महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा करण्याऐवजी गोंधळच घातला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना धक्काबुक्की तर केलीच शिवाय सभागृहातल्या माईकचीही तोडफोड केली.
अकोला शहरातील पाणी टंचाईची समस्या सध्या ऐरणीवर आहे. पाणी टंचाईच्या निवारणार्थ प्रस्तावित उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आज विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेत पाणी टंचाई निवारणासाठी सरकारकडे १४ कोटींचा प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा होणार होती. मात्र, सभा अक्षरशः गोंधळात वाहून गेली.
पाणी टंचाईच्या मुद्द्यावर प्रशासनाच्या भूमिकेवर विरोधकांच्या भावना तीव्र होत्या. मात्र सत्ताधारी प्रशासनाला या मुद्द्यावर पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत विरोधी भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळात भारिप-बहुजन महासंघाचे गट नेते गजानन गवई आणि भाजप शिवसेनेच्या सदस्यांमध्ये अक्षरशः धक्का-बुक्की होत हाणामारीचा प्रसंग उद्भवला. गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या अजय शर्मा, योगेश गोतमारे आणि सुरेश अंधारे या तीन नगरसेवकांच्या निलंबनाचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी महापौरांकडे पाठवलाय. या गोंधळानंतर महापौर ज्योत्स्ना गवई यांना सभा तासभरासाठी तहकूब करावी लागली.
व्हिडिओ पाहा :
First Published: Wednesday, May 16, 2012, 17:29