Last Updated: Friday, May 25, 2012, 17:27
www.24taas.com, पुणे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याचा मोठा फटका परदेशी शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना बसलाय. शिक्षणासाठीच्या खर्चात अचानक वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांचं बजेट कोलमडलंय. अशा परिस्थितीत काही विद्यार्थी कर्ज वाढवून घेतायत. तर काहींनी अमेरिकेऐवजी दुसऱ्या देशात शिक्षणासाठी जायचं ठरवलंय.
पुणे विद्यापीठातून एमएससी केलेल्या प्रियांकाला आता फॉरेन्सिक सायन्समध्ये एमएस करायचंय. तिला अमेरिकेतल्या जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठात प्रवेशही मिळाला. पण, तिच्यासमोर अचानक एक मोठी समस्या उभी राहिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं मूल्यं घसरलं आणि अर्थातच तिच्या अमेरिकेतल्या शिक्षणाचा खर्च वाढला. तिला आता एज्युकेशन लोनची रक्कम वाढवावी लागणार आहे. ही अवस्था एकट्या प्रियांकाची नाही तर इतर अनेक विद्यार्थ्यांची सध्याची काहिशी अशीच परिस्थिती आहे. अमेरिकेतल्या शिक्षणासाठीचं त्यांचं बजेटच कोलमडलंय.
पुण्यातून दरवर्षी सुमारे ६ ते ८ हजार विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात. त्यापैकी ५० ते ६० टक्के विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबातले असतात. रुपयाचं मूल्यं घरसल्यानं अचानक शिक्षण महाग झालं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मोठ्या कष्टानं मिळवलेला प्रवेश रद्द करावा लागतोय. अशा परिस्थितीत रुपयाची घसरण थांबायला हवी किंवा सरकारनं कमी व्याजदराचं कर्ज उपलब्ध करुन द्यावं, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
First Published: Friday, May 25, 2012, 17:27