लाच घेताना पोलिसांनाच अटक - Marathi News 24taas.com

लाच घेताना पोलिसांनाच अटक

www.24taas.com, मुंबई 
 
मुंबईत एका हॉटेल मालकाकडून दहा हजारांची लाच घेताना मुंबई पोलीस दलातील एसीपी कृष्ण चौधरी आणि एका हवालदाराला रंगेहाथ अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली. तर काल नाशिकमध्येही दोन उच्चपदस्थ लाचखोर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
 
मुंबईतल्या पवईतील एका हॉटेल व्यावसायिकानं हॉटेल परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केला होता. हे नुतनीकरण करण्याच्या मोबदल्यात कृष्ण चौधरी यांनी हॉटेल चालकाकडं दहा हजारांची मागणी केली. हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर कृष्ण चौधरी यांना आणि यांच्यासोबत काम करणारे हवालदार शिंगारे यांना दहा हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.
 
तर नाशिकमध्ये, सहकार विभागाचे सहनिबंधक एस.के. शेंडपुरे आणि उपलेखा परीक्षक नरेंद्र नागरे या दोन अधिकाऱ्यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. आदिवासी विकास महामंडळातील लेखापरीक्षक प्रतिभा पवार यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. प्रतिभा पवार यांची बदली नाशिक विभागातच कायम करण्यासाठी शेंडपुरे यांनी लाच मागितली होती. त्यानुसार शेंडपुरे यांच्या राहत्या घरी ‘राही अपार्टमेन्ट’मध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

First Published: Sunday, May 27, 2012, 17:15


comments powered by Disqus