‘पीडब्ल्यूडी’च्या परीक्षेत गोंधळच गोंधळ - Marathi News 24taas.com

‘पीडब्ल्यूडी’च्या परीक्षेत गोंधळच गोंधळ

www.24taas.com, नाशिक  
 
नाशिक शहरातील भोसला शाळेत झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या परीक्षेत कॉपी झाल्याचा आरोप होत आहे. यावरूनच आज राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत परीक्षा काही काळासाठी बंद पाडली.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता, वरीष्ठ लिपिक पदासाठी होत असलेल्या परीक्षेसाठी मराठवाडा आणि विदर्भातून परीक्षार्थी आले होते. शहरातील चार केंद्रांवर या परीक्षेचं आयोजन केलं गेलं होतं. मात्र, भोसला शाळेतील केंद्रात पीडब्लूडी विभागाच्या कर्मचाऱ्यानंच आपल्या मुलाला कॉपी पुरवल्यानं विद्यार्थी भडकले. त्यांनी शेवटच्या दहा मिनिटात या केंद्रात गोंधळ घातला व ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली. त्यानंतर कॉपीबहाद्दर विद्यार्थी आणि त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली गेली. आणि पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा परीक्षा घेण्यात आली.
 
राज्यभरातून एमकेसीएल या संस्थेच्या अंतर्गत होणाऱ्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाही अफलातून आहेत. जुन्या प्रश्नपत्रिकांवर खाडाखोड करून पेपर तयार करण्यात आले आहेत. प्रश्नही चुकीचे असल्याचा परीक्षार्थींनी आरोप केला आहे. राज्यभरात विद्यापीठांचे पेपरफुटीची प्रकरणे गाजतच आहेत. पण, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवून झालेल्या या प्रकारानं शासकीय परीक्षामध्येही गोंधळ होत असल्याचं स्पष्ट झालंय.
 

First Published: Sunday, May 27, 2012, 20:15


comments powered by Disqus