अकोला बनलंय अवैध औषधविक्रीचं केंद्र - Marathi News 24taas.com

अकोला बनलंय अवैध औषधविक्रीचं केंद्र

www.24taas.com, अकोला
 
अकोल्यात ऑक्सिटोसीनच्या ७७ हजार इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय. दुधाळ जनावरांना पान्हवण्यासाठी हे औषध वापरण्यात येतं. या औषधाच्या विक्रीला बंदी असतानाही त्याची बाजारात खुलेआम विक्री सुरु आहे.
 
नागरिकांच्या जीवाशी हा खुलेआम खेळ सुरु आहे. म्हशीला पान्हवण्यासाठी ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा दूध उत्पादकांकडून गैरवापर होतो. अकोल्यात हे इंजेक्शन खुलेआम विक्रीसाठी आणलं जात होतं. रेल्वेपार्सलमधून ऑक्टोसीनचा साठा येत असल्याची पोलिसांना कुणकुण लागताच सापळा रचून ऑक्सिटोसीनच्या अवैध साठ्यासह अरुणकुमार शर्मा याला अटक करण्यात आलीय. अरुणकुमार हा मुळचा बिहारच्या गया जिल्ह्यातला आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार पकडलेल्या मालाची किंमत १९ हजार रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र काळ्या बाजारात याची किंमत यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं सांगितलं जातय.
 
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या इंजेक्शनच्या विक्री आणि वापराला बंदी आहे. तरीही हा घातक खेळ सर्रास सुरु असलेला दिसतो. या घटनेमुळे अकोला हे औषधाच्या अवैध विक्रीचे केंद्र बनल्याचं उघड झालय. या औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांचे इतर राज्यातल्या दलालांशी संबंध असल्याचं पुढं आलंय. त्यामुळं आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी काय कारवाई होतेय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
 

First Published: Monday, May 28, 2012, 22:27


comments powered by Disqus