'सुकन्या' अडकली राजकारणात - Marathi News 24taas.com

'सुकन्या' अडकली राजकारणात

www.24taas.com, मुंबई
 
राज्यात स्त्री भ्रूण हत्येसारख्या घटना रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने आणलेल्या सुकन्या योजनेला अर्थखात्याने खोडा घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या विषयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावे, यासाठी अर्थखाते सांभाळणाऱ्या अजितदादांनी काँग्रेसच्या मंत्र्याने आणलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आडवल्याची चर्चा आहे.
 
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने क्रांतीज्योत सावित्रीबाई सुकन्या ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत...
- बीपीएल कुटुंबातील मुलीला ती १८ वर्षांची झाल्यानंतर तिला १ लाख रुपये मिळतील अशी तरतूद करण्यात आलीय.
- एका कुटुंबातील दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- मुलगी जन्माला आल्यानंतर  तिच्या नावे एसबीआय आणि एलआयसीमध्ये पैसे गुंतवणार
- मुलीचे शिक्षण दहावी असणे आवश्यक
- उच्च शिक्षण, व्यवसाय आणि आपल्या इतर गरजांसाठी मुलगी ही रक्कम खर्च करू शकेल.
अशा काही महत्त्वाच्या तरतूदी या योजनेत करण्यात आल्यात. मुलींना अशा प्रकारे सक्षम बनवणारी सुकन्या योजना मात्र राजकीय श्रेयाच्या वादात अडकली आहे. महिला व बालविकास विभाग काँग्रेसकडे आहे. त्यामुळे याचे श्रेय काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थखाते सांभाळणाऱ्या अजित पवारांनी ही योजना अडवल्याचं  बोललं जातंय. अजितदादांचे समर्थक विनायक मेटे यांनी बीडमध्ये अजित बालिका योजनेअंतर्गत अशाच प्रकारे मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी खाजगी योजना राबवली आहे. त्यामुळेच महिला बालविकास विभागाची सुकन्या योजना अडकली आहे.
 
वर्षा गायकवाड यांनी मात्र याबाबतीत बोलताना सावध पवित्रा घेतलाय. स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न राज्यात गंभीर बनला असताना ही महत्त्वाकांक्षी योजना अडकली आहे. या योजनेसाठी ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीची आवश्यकता आहे. आता अर्थखाते या ५०० कोटी रुपयांच्या योजनेला मंजूरी देते की ही योजना राजकीय श्रेयाच्या वादात अडकते ते पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
 

First Published: Saturday, June 16, 2012, 12:54


comments powered by Disqus