Last Updated: Saturday, June 30, 2012, 10:42
www.24taas.com, पंढरपूर ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.
अवघी पंढरी विठूरायाच्या जयघोषानं दुमदुमून गेलीय. काही पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. त्या सावळ्या सुंदर रुपाला न्हाऊमाखू घातलं गेलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाल्यानंतर दर्शन सोहळ्याला सुरुवात झालीय. हा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारलंय. आषाढी निमित्तानं पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरलाय. लाखो वारकरी चंद्रभागेच्या तीरावर दर्शनासाठी जमा झालेत. चंद्रभागेच्या तीरावर जणू भक्तीसागर उसळलाय. आसमंतात केवळ विठूनामाचा गजर दुमदुमतोय. साऱ्यांनाच उत्कंठा लागलीय ती आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनाची. पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आलीए. या विद्युत रोषणाईनं मंदिर उजळून गेलंय. रोषणाई आणि लाखो वारकऱ्यां मंदिर परिसरात चैतन्य निर्माण झालंय.
.
First Published: Saturday, June 30, 2012, 10:42