४८ तासात पाऊस, कोकणात मुसळधार - Marathi News 24taas.com

४८ तासात पाऊस, कोकणात मुसळधार

www.24taas.com, पुणे/रत्नागिरी
 
पावसानं दडी मारलेली असतानाच हवामान खात्यानं पुन्हा एकदा दिलासा दिलाय. राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि ओरिसात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, कोकणात संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथे शेतीच्या कामाला वेग आला आहे.
 
संपूर्ण राज्यावर वरुणराजा रुसला असला, तरी कोकणावर मात्र तो प्रसन्न झाला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. गणपतीपुळे परिसरातही मुसळधार पावसानं मालगुंड, गणपतीपुळेजवळच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
 
कोकणातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय, तर महामार्हावरील वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. कणकवली कोल्हापूर मार्गावर करुळ घाटात दरड कोसळी आहे, त्यामुळे कणकवली कोल्हापूर वाहतूक ठप्प झाली आहे. फोंडा घाटातर्फे सध्या ही वाहतूक वळवण्यात आलीय.. तर कणकवली आचरा मार्गावरची वाहतूकही बंद झालीय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं हा मार्ग बंद झाला आहे. संततधार पावसानं शेतकरी सुखावला असून तिन्ही जिल्ह्यात लावणीची कामे सुरु आहेत. जवळपास ८० टक्के कामे पूर्णही झाली आहेत.

First Published: Monday, July 2, 2012, 16:59


comments powered by Disqus