Last Updated: Tuesday, July 10, 2012, 12:14
www.24taas.com, मुंबई अन्न व औषध प्रशासनानं ११ जुलैपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू ठेवता येईल, असं फर्मान काढलंय. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेचा औषध विक्रेत्यांनी मात्र जोरदार निषेध केलाय. यासाठी राज्यातील ५० हजार औषध विक्रेत्यांनी तीन दिवसांच्या बंदची घोषणाही केलीय.
संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच मेडिकल स्टोअर सुरू राहतील, नोंदणीकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्दी-तापाची औषधेही देऊ नयेत तसंच फार्मासिस्ट असल्याशिवाय मेडिकल स्टोर सुरू ठेऊ नये, नाहीतर तुरूंगात जावं लागेल, अशा काही सूचना अन्न व औषध विभागानं जाहीर केल्यात. मात्र, मेडिकल स्टोअर्सना नोंदणीकृत डॉक्टरांची यादी उपलब्ध करून देण्याची तसदी मात्र प्रशासनानं टाळलीय. अपल्या अशी कुठलीही यादी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. यावर महाराष्ट्र स्टेट केम्सिट्स ऍन्ड ड्रगिस्ट्स असोसिएशनचे सरचिटणीस अनिल नवांदर यांनी जोरदार टीका केलीय.
ज्या गावांमध्ये अजून पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत किंवा ज्या ठिकाणी अॅलॉपॅथीचे डॉक्टर्सच नाहीत, अशा ठिकाणच्या नागरिकांना मात्र यामुळे चांगला फटका बसणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने रुग्णांचं हित लक्षात न घेता औषध विक्रेत्यांवर नियमांचे पालन करण्याची सक्ती केलीय. प्रशासनाच्या या नियमांचं पालन आम्ही करणार मात्र, रुग्णहिताच्या दृष्टीने कुणाला आपात्कालिन परिस्थितीत औषधे हवी असतील तर ती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही दूरध्वनी क्रमांक देणार आहोत, असे नवांदर यांनी स्पष्ट केलंय. पण, या निर्णयाचा निषेध म्हणून राज्यातील ५० हजार औषध विक्रेते १८ जुलै ते २० जुलैपर्यंत तीन दिवसांचा बंद पुकारणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशननं मात्र महाराष्ट्रात सुमारे दोन लाख बोगस डॉक्टर्स कार्यरत असल्याचा धक्कादायक आरोप केलाय. अशा डॉक्टरांवर तातडीनं कारवाई व्हावी, अशी मागणी ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर यांनी केलीय.
First Published: Tuesday, July 10, 2012, 12:14