Last Updated: Tuesday, July 24, 2012, 08:15
www.24taas.com, सोलापूरसोलापूरमध्ये एका जंगलात मुलींची विक्री सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून हा डाव हाणून पाडला. यावेळी पोलिसांनी नऊ अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. या भागात अल्पवयीन मुलींची तस्करी करणारी मोठी टोळी कार्यरत असावी, असा संशय या भागात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना आहे.
सोलापूर-कर्नाटक सीमेवरच्या ‘मंद्रुप’ या गावाजवळच्या जंगलात नऊ अल्पवयीन मुलींच्या तस्करीचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय. नोकरीचं आमिष दाखवून बांग्लादेशातून आणलेल्या या नऊ मुलींची विक्री करण्यात येत होती. पुण्याच्या ‘रेस्क्यू फाऊंडेशन’ला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या अल्पवयीन मुलींची सुटका केली. सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे.
चांगल्या रोजगाराचं आमिष दाखवून या मुलींना बाग्लादेशातून भारतात आणलं जातं. विशेष म्हणजे चाळीस हजार रुपयांना एका मुलीची खरेदी केली जाते आणि सीमावर्ती भागात दोन ते तीन लाखांना विक्री केली जाते. या मुलींचा देहविक्रीसाठी वापर केला जातो. जर या मुलींनी विरोध केला तर त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जातात, अशी माहिती यावेळी रेस्क्यू फाऊंडेशनच्या सेक्रेटरी शायनी मारपार यांनी दिली. एकूणच सीमावर्ती भागात पोलिसांनी सतत चौकस राहणं गरजेचं असताना एका सामाजिक संस्थेनं पुढाकार घेऊन मुलींची सुटका केलीय.
.
First Published: Tuesday, July 24, 2012, 08:15