Last Updated: Thursday, January 19, 2012, 21:23
www.24taas.com, मुंबई रश्मी पाटकररंगलेल्या मैफिलीला वेदनेची साथ आहे,
सरत आल्या भैरवीचा वेदनाच श्वास आहे,
पैलतीरीच्या शांततेची मग लागलेली आस आहे..,
मार्ग मुक्तीचा सुखी असावा हा त्यांचा ध्यास आहे..

जीवन आणि मृत्यू. जगातील दोन शाश्वत सत्ये..!! एकाच नाण्याच्या दोन बाजू..!! असं म्हणतात की या जगात जन्माला येण्याचा फक्त एकच मार्ग आहे; पण मरण मात्र अनेक मार्गांनी येऊ शकते. माणूस जीवनावर प्रेम करतो,पण कधी कधी माणसाला आयुष्यात एवढा त्रास सहन करावा लागतो की त्याला जगण्यापेक्षा मरण जास्त सोयीस्कर वाटायला लागते. पण दुर्दैवाने त्याला येणारा मृत्यूसुध्दा सहजासहजी येत नाही. येताना सोबत अजून वेदना घेऊन येतो. अशा मृत्यूच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे “कर्करोग”.
या रोगाच्या नावातच त्याच्याबरोबर येणारे त्रास लपलेले आहेत. कर्क म्हणजे खेकडा. खेकडा जसा वाळू पोखरत जातो अन् त्याची पकड जशी मजबूत असते तसाच हा रोग, रोग्याचे शरीर पोखरत जातो. कितीही उपाय केले तरी तो आपली पकड सोडत नाही. कर्करोग्याला प्रचंड हाल सहन करावे लागतात. पण जेव्हा सगळे उपाय थकतात तेव्हा डॉक्टर अशा रूग्णाला “TERMINALLY ILL” म्हणजे कायमस्वरूपी रूग्ण म्हणून घोषित करतात. वेदना तर प्रचंड होत असतात पण उपाय मात्र करता येत नाही आणि मरावं म्हटलं तर मरण लवकर येत नाही अशा कात्रीत सापडलेला तो रूग्ण त्याच्या घरच्यांसाठी एक दुखरी नस होऊन जातो. मग अशा रूग्णांनी जायचं कुठे..?? हाच प्रश्न बहुधा व्यवसायाने कर्करोग शल्यविशारद म्हणजे कॅन्सर सर्जन असलेल्या डॉ.ल्युसीटो यांना पडला आणि त्यातूनच जन्म घेतला “
शांती अवेदना सदन” या संस्थेने.
दिनांक २ नोव्हेंबर १९८६ रोजी डॉ.ल्युसीटो यांनी “
शांती अवेदना सदन” या आश्रमाची स्थापना केली. वांद्रयाला माउंट मेरीच्या चर्चसमोरच हा सदन उभा आहे. या संस्थेच्या नावातच तिचे कार्य लपलेले आहे. रोगाने सगळे शरीर पोखरलेल्या, असह्य वेदनांनी गलितगात्र झालेल्या आणि मरणाची वाट पाहत जगणाऱ्या रूग्णांची येथे सेवा केली जाते. डॉ.ल्युसीटो यांच्या मते हा सदन म्हणजे रूग्णालय नाही किंवा नर्सिंग होम सुध्दा नाही कारण इथे बरे होण्याचे काहीच उपाय केले जात नाहीत. कर्करोगावरचे सर्व उपाय करून झाल्यावर सुध्दा जेव्हा रोग्याचे मरण डॉक्टरांना निश्चीत दिसत असते तेव्हा अशा रूग्णासाठी ते एक शुश्रूषालय म्हणून काम करतो. इथे कर्करोग्यांना मरणाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. अशा रूग्णांसाठी सदन असणे ही संकल्पनाच खूप अभिनव आहे. आजच्या जगात जिथे जिवंत माणसाची काळजी घेण्यासाठी कोणाला वेळ नाही, तिथे मरणाऱ्या माणसाला कोण विचारतो. म्हणूनच डॉ.ल्युसीटो यांचे कार्य खूप कौतुकास्पद ठरते.

डॉ. ल्युसीटो यांच्या मार्गदर्शनाखाली १५ नन्स हा सदन बघतात. आपल्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात पण कधी-कधी काही माणसांच्या शरीरात त्यांची अवास्तव वाढ होऊ लागते. ह्या वाढीला विशिष्ट कारणे असतात पण अजून तरी ती कारणे वैद्यकीय शास्त्राला अनभिज्ञ आहेत. ह्या पेशी रक्तातून शरीरात सर्वत्र संचार करतात. मग त्या एखाद्या विशिष्ट अवयवांच्या मूलपेशींशी जाऊन चिकटतात आणि स्वत:ची वाढ करू लागतात. ही फाजील वाढ कधी कधी ट्युमरच्या स्वरूपात दिसून येते. म्हणजेच ट्युमर हा कर्करोगाचे प्राथमिक स्वरूप असु शकतो. तो केमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकता येतो. पण कर्करोगाच्या पेशी कधीच पूर्णत: नष्ट करता येत नाहीत. ट्युमर काढून टाकलेल्या माणसाला सुध्दा भविष्यात पुन्हा तोच त्रास होऊ शकतो. कर्करोगाचे निदान जर अगदी प्राथमिक अवस्थेत झाले तरच तो बरा होऊ शकतो. कर्करोगाचे दुसऱ्या टप्प्यात निदान झाले तर तो आटोक्यात ठेवता येतो. तिसरा टप्पा मात्र थेट मृत्युपर्यंत नेणारा असतो.
दुसऱ्या टप्प्यात निदान झालेल्या रोग्यासाठी केमोथेरपी किंवा तत्सम उपाय असतात पण जर त्यांना पुनःपुन्हा त्रास होऊ लागला तर मात्र त्यांच्यावर उपाय करणं कठीण होऊन बसतं. कारण केमोथेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशी जेव्हा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा रोग्याच्या चांगल्या पेशीही नष्ट होतात आणि परत त्यांना त्रास होऊ लागतो. कर्करोगाच्या पेशींची वाढ ही सर्वसाधारण लाल किंवा पांढऱ्या पेशींपेक्षा जास्त असते; आणि अधिक वेगाने होत असते. त्यामुळे केमोथेरपीसारखे उपचार हे वारंवार करता येत नाहीत. कारण त्यात रूग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जेव्हा केमोसारखे उपाय करूनसुध्दा कर्करोगाच्या पेशींची वाढ होतच राहते तेव्हा अशा रोग्याचे सर्व उपचार थांबवण्याचा सल्ला डॉक्टर नातेवाईकांना देतात. अशा रूग्णांसाठी एक विशिष्ट शब्द वैद्यकशास्रात वापरला जातो म्हणजेच कायमस्वरूपी रूग्ण (TERMINALLY ILL).
या रोग्यांचे मरण निश्चित असते. पण त्यांना घरात ठेवून त्यांची देखभाल करणे खूप जोखमीचे काम असते. उपचारादरम्यान त्यांचे शरीर खूप अशक्त झालेले असते; म्हणून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. होणाऱ्या वेदनांमुळे रूग्ण विव्हळत असतो. त्यामुळे त्याच्या घरातील वातावरणावरही त्याचा परिणाम होत असतो. अशा रूग्णांसाठीच हा सदन काम करतो. इथे आणण्यात आलेल्या काही रूग्णांची परिस्थिती कधीकधी फार दयनीय, क्वचित किळसवाणी असते. काहींना झालेल्या जखमांमध्ये संसर्ग होऊन त्यात कीडे तयार होतात आणि त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. इथल्या प्रशिक्षीत नर्सेस त्या जखमा साफ करतात आणि त्यावर मलमपट्टी करतात. ज्या रूग्णांना त्रास असह्य होऊ लागतो अशांना मॉर्फीन सारखी झोपेची औषधे देऊन त्यांना शांत करण्याचे प्रयत्न केले जातात. रूग्णांना वेळेवर व पौष्टिक जेवण दिले जाते. जेवणात शाकाहार व मांसाहार दोहोंचा समावेश असतो. दर अर्ध्या ते एक तासाने त्यांना फळांचे रस, दूध इ. पुरवण्यात येते. इतकेच नाही तर जेवणानंतर आईस्क्रीम देखील देण्यात येते.
रूग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्ही उपलब्ध आहे. ह्या आश्रमात सर्व जाती-धर्मांच्या कर्करोग्यांची सेवा केली जाते. ज्या रूग्णाचा अंतिम काळ जवळ आलेला असतो त्याला वेगळ्या खोलीत ठेवले जाते. जर तो रूग्ण विवाहित असेल तर त्याच्या जोडीदाराला त्याच्याबरोबर राहण्याची मुभा दिली जाते. स्त्रिया व पुरूष यांच्यासाठी वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक मजल्यावर एक माणूस देखरेख करण्यासाठी नेमलेला असतो तसेच रूग्णांची काळजी घेण्यासाठी दोन डॉक्टर्स हजर असतात. या आश्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे विनामूल्य सेवा केली जाते. याचा सर्वात जास्त फायदा गरीब माणसांना होतो. कर्करोग्यांना त्यांच्या शेवटच्या काळात कमीतकमी त्रास व्हावा; शक्यतो त्यांना येणारा मृत्यु वेदनाविरहीत असावा यासाठी इथे अथक प्रयत्न केले जातात. त्यांच्यासाठी हा सदन म्हणजे मुक्तिधामच आहे.
शांती अवेदना सदन
२१६, मांऊट मेरी मार्ग, बांद्रा पश्चिम,
मुंबई- ४०० ०५०.
दूरध्वनी क्र- २६४२७४६४, २६४५१७०२.
संकेतस्थळ : www.shantiavedanasadan.org
ई-मेल : shantiavedanasadan@gmail.com
कार्यालयीन वेळ- सकाळी ८ ते संध्याकाळी ७.
(वरील लेख इंद्रधनू या वार्षिक मासिकातून घेण्यात आला आहे.)
First Published: Thursday, January 19, 2012, 21:23