अजित पवारांचा दरेकरांवर पलटवार - Marathi News 24taas.com

अजित पवारांचा दरेकरांवर पलटवार

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
ऊस दरवाढीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ऊस दरवाढीच्या मुद्यावरून अजित पवारांनी मनसेला टीकेचं लक्ष्य केलं. मनसेच्या ताब्यात असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं साखर कारखान्यांना कर्ज द्यावं अशी सुचना अजितदादांनी केली. त्याला मुंबै बँकेचे अध्यक्ष असलेल्या प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
 
ऊस दरवाढीवरून पेटलेलं आंदोलन थंड होतं असताना आता मनसे विरूद्ध राष्ट्रवादी यांच्यात वाद सुरु झाला. जादा दराची मागणी विरोधक करतात मग मुंबै बँकेनं या कामी पुढकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत विरोधकांची कोंडी केली. मनसेचे आमदार प्रवीण दरेकर हे या बँकेचे अध्यक्ष असल्यानं अजितदादांनी विरोधकांना कृती करण्याचं आव्हान दिलं. अजित दादांनी आव्हान दिल्यानं दरेकरांनी मुंबै बँकेनं साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची आकडेवारीच सादर केली. मुंबै बँकेनं २५ कारखान्यांना १८५ कोटी रुपये कर्ज दिलं. त्यापैकी केवळ ३ कारखान्यांनी कर्जाची परतफेड केली.
 
त्यामुळं २२ कारखान्यांकडे मुद्दल आणि व्याज मिळून २९७ कोटींची थकबाकी आहे.  याची थकहमी सरकारनं घेतल्याचं बँकेचं म्हणण आहे. त्यामुळं मुंबै बँकेनं थकहमी अंतर्गत भरपाई सरकारला मागितली. सरकारनं प्रतिसाद दिला नसल्याचा बँकेचा आरोप आहे. सरकारनं आधी थकबाकी वसूल करायला मदत करावी मगच मगच कारखान्यांना मदतीची भाषा बोलावी असं प्रतिआव्हान दरेकर यांनी दिलं.राष्ट्रवादीतून सहकार क्षेत्रातले ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांनी नुकताच मनसेत प्रवेश केला. त्यामुळं महत्त्वाचा नेता पक्षाबाहेर गेल्यानं राष्ट्रवादीचे नेते संतापलेत. त्यातूनच हे कुरघोडीचं राजकारण सुरु आहे.

First Published: Sunday, November 13, 2011, 05:46


comments powered by Disqus