मराठी नववर्षाचा उत्साह ओसंडला - Marathi News 24taas.com

मराठी नववर्षाचा उत्साह ओसंडला

www.24taas.com, मुंबई
 
 
आज गुढीपाडवा. हिंदु नववर्षदिन, या नववर्षदिनाचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे.  मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे.  गिरगावात पारंपरिक वेशभूषा करून आबालवृद्ध घराबाहेर पडलेत.. ढोल-ताशांच्या गजरात, लेझिम पथकाच्या साथीनं सा-यांनी स्वागतयात्रेचा आनंद घेतला.
 
 
गिरगाव
गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला. शोभायात्रांनी परिसर फुलून गेला होता. तर विविध चित्तथरारक कवायतींनी उपस्थितांची चांगलीच मने जिंकली. हिंदू नव वर्षाच्या स्वागतासाठी असंख्य गिरगावकर शोभायात्रेत सहभागी झाले होते.
 
 
विलेपार्ले
विलेपार्लेमध्येही नववर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळतोय. पारंपरिक पद्धतीनं पार्लेकर स्वागत यात्रेत उत्साहात सहभागी झालेत. परंपरा टिकविण्यासाठी मिरवणूकीत पार्लेकर गुढी घेऊन स्वागत यात्रेत सहभागी झालेत. लेझीम पथकंही यात सहभागी झालेएत.तसंच पार्ल्याचा 100 वर्षाचा इतिहास सांगणा-या ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. पार्ल्याच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत.
 
 
ठाणे
ठाण्यातही नवर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून येतोय. ठाण्यात कौपिनेश्वर मंदिरातून स्वागत यात्रेला सुरूवात झाली. लेझिम पथकाचं संचलन. विविध चित्ररथ याशिवाय भव्य रांगोळी हे ठाण्याच्या गुढीपाडव्याचं खास वैशिष्ट्य. पाडव्याच्या निमित्तानं ठाण्याच्या गावदेवी मैदानात रंगवल्ली परिवारच्या वतीनं १६ हजार चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आलीय.  ७५ कलाकारांनी ८ तास मेहनत करुन ही मत्स्य आणि बदाम अवताराची रांगोळी रेखाटली आहे. ठाण्याच्या गावदेवी परिसरात काढण्यात आलेली ही भव्य रांगोळी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
डोंबिवली

अशाच नववर्ष स्वागत यात्रेचं डोंबिवलीतही आयोजन केलंय. डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेचं यंदाचं हे १४ वं वर्ष आहे. यावर्षी स्वच्छ डोंबिवली, सुंदर डोंबिवली ही संकल्पना चित्ररथांसाठी देण्यात आली आहे. एकूण ८५  ते ९०चित्ररथ यावर्षी नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झालेत. आणि शंभरहून अधिक संस्थाही या स्वागत यात्रेत सहभागी झाल्या आहेत. तमाम डोंबिवलीकरांच्या साक्षीनं भागशाळा मैदानापासून सुरू झालेली ही नववर्ष स्वागत यात्रा डोंबिवली पूर्वेतल्या फडके रोडवर समाप्त होणार आहे.
 
 
 
 
पुणे
पुण्यात गुढीपाडव्याचा चांगलाच उत्साह दिसून येतोय. कोथरूडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. यात पुणेकर मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभुषेत सहभागी झाले. शोभायात्रेत देशभक्ती, सामाजिक एकतेचे संदेश देणारे चित्ररथ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. तर नाशिकमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह आहे.
 
 
मराठी कलाकारांनी पुण्यात गुढीपाडवा साजरा केला. कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एकत्र येऊन मराठी कलाकारांनी सांस्कृतिक गुढी उभारली. दरवर्षी ही गुढी उभारली जाते. आणि एका कलाकाराला गुढी उभारण्याचा मान दिला जातो. यंदा भार्गवी चिरमुले आणि तिचा पती पंकज एकबोटे या दाम्पत्यानं गुढी उभारली. यावेळी अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधत यशवंतरावांच्या प्रतिमेसमोर ही गुढी उभारण्यात आली.
 
 
पुण्यात गुढीपाडव्याचा चांगलाच उत्साह दिसून येतोय. शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी अवघं पुणं दुमदुमलंय.  कोथरूडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरु झालेल्या शोभायात्रेचा थाट काही औरच होता. यात पुणेकर मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभुषेत सहभागी झाले. शोभायात्रेत देशभक्ती, सामाजिक एकतेचे संदेश देणारे चित्ररथ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रेत घडले.
 
 
नाशिक
 मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या विविध भागातून ढोलताशांच्या गजरात या शोभायात्रेनं नाशिकरांचं लक्ष वेधून घेतलं. पारंपारिक वेशभूषेत समतेचा संदेश देणारे चित्ररथांचाही समावेश करण्यात आला होता. काही मराठी सिनेकलाकारांनीही या शोभायात्रेला हजेरी लावली होती. नागपूरमध्येही विविध कार्यक्रमांनी नववर्षाची सुरूवात झाली. शहरातली सर्वात उंच अशी 71 फुटांची गुढी उभारण्यात आली. तर दुसरीकडे 50 फुटांची गुढी उभारण्यात आली.
 
 
 

First Published: Friday, March 23, 2012, 15:59


comments powered by Disqus