Last Updated: Saturday, April 28, 2012, 21:28
www.24taas.com, देवेंद्र कोल्हटकर, मुंबई 
मुलं हरवण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षापासुन वाढ झालेली पहायला मिळते आहे. नँशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून सर्वात जास्त मुलं हरवली आहेत. त्यामुळे ही मुलं नेमकी जातात तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच ही मुलं शोधण्यात तपास यंत्रणा ही अपयशी ठरल्यात.
भांडुपच्या टेंभीपाडा परिसरात राहणाऱ्या श्यामप्रसाद गुप्तांचा १३ वर्षाचा मुलगा सुरज ऑक्टोंबर २००८ पासून गायब आहे. घराजवळच्या परिसरातच खेळण्यासाठी गेलेले सुरज पुन्हा घरी परतलाच नाही. गुप्ता दांपत्यांनी आपल्या लेकासाठी जंगजंग पछाडलं पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. सुरजचा शोध घेण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रात त्याच्याबद्दलची माहिती दिली. स्थानिक पोलिस ठाण्यात देखील तक्रार केली. मात्र अद्यापही त्यांचा आपल्या मुलाचा शोध सुरू आहे.
श्यामप्रसाद गुप्ता यांच्या मुलाचं हे प्रातिनिधीक उदाहरण झालं. मात्र गेल्या काही वर्षाची आकडेवारी पाहिली तर मुलं हरवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नँशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहिती नुसार २००८ ते २०१० च्या दरम्यान महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त मुलं हरवली आहेत. आपल्या काळजाचे तुकडे असणारी मुलं हरवल्याने त्या कुटुबिंयाना कुठल्या परिस्थितीतून जावं लागत असेल याची कल्पना केली जाऊ शकत नाही. या मुलांना शोधण्यासाठी असणाऱ्या यंत्रणाही अपयशी ठरल्यात. त्यामुळं ही मुलं परत सापडणार का.. हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
First Published: Saturday, April 28, 2012, 21:28