नाराजी, बंड आणि तोडफोड - Marathi News 24taas.com

नाराजी, बंड आणि तोडफोड

www.24taas.com, मुंबई/ठाणे/बीड
 
महापालिका निवडणुकांचे वारे जोराने वाहायला सुरुवात झालीय. आघाडी आणि युतीच्या बोलणी झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आता अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.
 
काहींनी नाराजी व्यक्त करताना बंड केलं तर काहींनी त्यापुढं जाऊन तोडफोड केली.  असाच प्रकार गुरूवारी रात्री वरळीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजीतून भाजपाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
 
 
शिवसेना-भाजपात ठिणगी
 

वरळीच्या वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये हा प्रकार घडला. हा वॉर्ड शिवसेनेसाठी राखीव झाल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ करत नाराजी व्यक्त केली.
 
शिवसेनेतून भाजपामध्ये आलेले प्रकाश पवार हे या वॉर्डातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळी हा वॉर्ड भाजपाने शिवसेनेसाठी सोडल्याने भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. या वॉर्डातून गेल्यावेळी छोटू देसाई हा निवडून आला होता. भाजपा कार्यकर्त्यांनी छोटू देसाईचा पुतळाही जाळला. हे शिवसेनेचं षडयंत्र असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
 
काय आहे, राष्ट्रवादीचं दुर्दैव !
 

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्ष सोडणं हा प्रकार दुर्दैवी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी म्हटलंय. याबाबत पक्षानं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा घरचा आहेर डावखरेंनी दिलाय.
 
निवडणुकांच्या काळात पक्षांतर होणं हे स्वाभाविक असून त्याचा फटका सगळ्याच राजकीय पक्षांना बसतो असंही त्यांनी म्हटलंय. आमदार जितेंद्र आव्हाडांची आक्रमक नेता अशी ओळख असली तरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच पक्षाचा चेहरा असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.
 
काका-पुतण्याचा वादात भाऊ
 

गोपीनाथ मुंडे काका-पुतण्याचा वाद आता विकोपाला जाण्याची चिन्हं आहेत. पुतण्याने काकाच्या विरोधात बीडमध्ये बंड केल्यानंतर आता आमदार धनंजय मुंडे यांचे वडिल आणि गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांनी या वादात उडी घेतलीय.
 
 
आता आम्हीसुद्धा यापुढे जशास तसं उत्तर देऊ या शब्दांत पंडितअण्णा यांनी गोपीनाथ मुंडेवर शाब्दिक वार केलाय. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, मात्र जर कोणी आमच्या वाटेला आलं तर संपवल्याशिवाय राहत नाही असा इशारा गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगड इथून दिला होता. त्यांच्या याच इशा-याला पंडित अण्णा यांनी उत्तर देत प्रतिहल्ला चढवलाय.

First Published: Friday, January 13, 2012, 17:07


comments powered by Disqus