राज पुरोहित देणार का राजीनामा? - Marathi News 24taas.com

राज पुरोहित देणार का राजीनामा?

www.24taas.com, मुंबई
 
भाजपचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहित राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पक्षात सतत डावललं जात असल्यानं पुरोहित नाराज आहेत. पुरोहित आज भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आपल्य़ा व्यथा मांडणार आहेत. राज पुरोहित गोपीनाथ मुंडे समर्थक मानले जातात. गेल्या काही दिवसांपासून मुंडेंच्या सर्व समर्थकांना डावललं जात असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.
 
मुंबईचे अध्यक्ष असतानाही शहरात झालेल्या अनेक उदघाटन कार्यक्रमांना त्यांना जाणिवपूर्वक बोलावण्यात आलेलं नाही. शिवाय निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्येही राज पुरोहितांचा सहभाग नव्हता. शिवाय मुंबई अध्य़क्ष म्हणून जो मानसन्मान मिळतो तोही मिळत नसल्याचं पुरोहितांचं म्हणणं आहे. त्यांच्या नाराजीची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही घेतली आहे. तसचं मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यातूनही मुंबई अध्यक्ष असलेल्या पुरोहितांचा फोटो गायब करण्यात आला होता.
 
त्यामुळं पुरोहित अधिकच दुखावले. त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या फोटोला भाजपच्या माझी मुंबई पुस्तिकेत पुन्हा स्थान देण्यात आलं. पुरोहितांचा फोटो नसणं ही प्रिंटींग मिस्टेक असल्य़ाचं भाजपमधून सांगण्यात येतं आहे. भाजपकडून काहीही दावे प्रतिदावे करण्यात येत असले तरी मुंडे गटाच्य़ा नेत्यांना डावलण्याची रणनीती कायम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व्यंकय्या नायडू आज मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. त्यावेळी व्यंकय्या- पुरोहित भेट होणार आहे.
 
 

First Published: Friday, January 20, 2012, 21:20


comments powered by Disqus