शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीचे आव्हान - Marathi News 24taas.com

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीचे आव्हान

www.24taas.com,
 
शिवसेनेत पुन्हा बंडखोरी झाली आहे. वडाळा, माटुंगा पाठोपाठ आता दादरमध्येही शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दादरमधल्या १८५ प्रभागाची उमेदवारी प्रविण शेट्ये यांना दिल्याने संजय भरणकर आणि भरत राऊत या माजी शाखा प्रमुखांनी बंडाचे निशाण फडकावलं आहे.
 
संजय भरणकर आणि भरत राऊत हे दोघेही अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.  शिवसेनेसाठी हा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रभाग आहे कारण याच प्रभागात मनसे प्रमुख राज ठाकरे राहतात. मनसेने या प्रभागातून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. सेनेतील बंडखोरीचा फायदा मनसे उमेदवाराला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दादरच्या या प्रभागातून अनेक जण झच्छुक होते त्यामुळेच आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रवीण शेट्ये यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली.
 
महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारी नाकारलेल्या नाराजांनी सर्वत्र बंडखोरी केल्याचं दिसून येतं आहे. कालच मनसेच्या नाराजांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंनाच गराडा घातला.
 
मागील विधानसभा निवडणुकीत दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सेना उमेदवार आदेश बांदेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नितीन सरदेसाई यांनी आस्मान दाखवलं होतं. त्यावेळेसच सेनेचा हा चिरेबंदी बालेकिल्ला ढासळला होता. यावेळेस काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे आणि त्यातच बंडखोरीला उधाण आल्याने सेना महापालिका राखते का ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
 

First Published: Tuesday, January 31, 2012, 11:14


comments powered by Disqus