बोटावरील शाई, लगेच निघून जाई ! - Marathi News 24taas.com

बोटावरील शाई, लगेच निघून जाई !

www.24taas.com, ठाणे
 
मतदानाच्या वेळी वापरण्यात येणारी शाई अत्यंत हलक्या दर्जाची असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी केला आहे. पूर्वी शाईचा वापर होत होता. मात्र आता मार्कर पेनचा वापर केला जातो. ही शाई रिमूव्हरने पटकन निघून जाते त्यामुळे बोगस व्होटिंगची भीतीही नाईक यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
ठाण्यात महापालिकेसाठी मोठ्य़ा उत्साहात मतदान होतंय. सामान्य नागरिक आणि नेत्यांनी सकाळपासून मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र शहराच्या सगळ्या भागात दिसून येत आहे. आमदार एकनाथ शिंदे यांनी किसन नगर क्रमांक दोन या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी वर्तकनगर भागात मतदान केलं.
 
शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्यात मतदान केलं. यावेळीही त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मला शिवसेनेनं प्रचारासाठी बोलावलं नाही असा आरोप त्यांनी सेनेवर केला. तसच कुणाकडे सत्ता जाईल हे ठाण्याची जनताच ठरवेल असंही त्यांनी सांगितलं.

First Published: Thursday, February 16, 2012, 17:21


comments powered by Disqus