पत्नीचे अपहरण, किणेंचा आत्महत्येचा इशारा - Marathi News 24taas.com

पत्नीचे अपहरण, किणेंचा आत्महत्येचा इशारा

www.24taas.com, ठाणे
 
 
ठाण्यात आज महापौरपदाची निवडणूक होत आहे. यातच अपहरणानाट्यामुळं गाजलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बंडखोर आणि मनसेच्या भूमिकेकडं लक्ष लागले असताना भाजप नगसेविकेच्या अपहरणनाट्याची घटना ताजी असताना काँग्रेसच्या नगरसेविका बेपत्ता झाल्याने राजकारण तापले आहे. दरम्यान, ठाण्यातील काँग्रेसचे नगरसेवक राजन किणे यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
 
 
काल दुपारपासून काँग्रेस नगरसेविका अनिता किणे बेपत्ता आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत त्या घरी आल्या नाही तर आपण आत्महत्या करु अशी धमकीच राजन  किणे यांनी दिली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात नाट्यमय घडामोडी घडत  असल्याने राजकीय गोटात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  काँग्रेसच्या नगरसेविका अनिता किणी आणि कुरेशी अन्सारी या नगरसेविका कुठे गेल्या याची माहिती नसल्याने काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वथा पसरली आहे. दोन्ही नगरसेविका शिवसेनेच्या दावणीला असल्याचे बोलले जात आहे.  तर दुसरीकडे, भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता प्रकरणामुळे ठाण्यातीलं राजकीय आणि सामाजिक वातावरणही चांगलंच ढवळून निघाल आहे.
 
 
काल शिवसेना-भाजप आणि आरपीआय महायुतीनं ठाणे बंद केला होता.  दरम्यानच्या काळात या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादी आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. भाजपने तर थेट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवरच अपहरणाचा आरोप करून तक्रार दाखल केली. एवढं सगळं होऊनही सुहासिनी लोखंडेंचा मात्र अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र, त्यांच्या मुलाने पोलीस बंदोबस्तात दहावीचा पेपर दिला. त्यामुळे हे राजकीय नाट्य रंगत असताना काँग्रेसची नगरसेविका गायब झाल्याने पुन्हा राजकीय घडामोडींनी वेग आला आहे.

First Published: Tuesday, March 6, 2012, 13:12


comments powered by Disqus