सय्यदना अंत्यदर्शनाच्यावेळी चेंगराचेंगरीत १७ ठार, ६६ जण जखमी, 17 killed & 66 injured stampede in Mum

सय्यदना अंत्यदर्शनाच्यावेळी चेंगराचेंगरीत १७ ठार, ६६ जण जखमी

सय्यदना अंत्यदर्शनाच्यावेळी चेंगराचेंगरीत १७ ठार, ६६ जण जखमी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दाऊदी बोहरा समाजाचे ५२ वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहंमद बुऱ्हानुद्दीन यांच्या अंत्यदर्शनावेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर ६६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या सेफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉ. सय्यदना यांचे शुक्रवारी मुंबईत निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने झाले. त्यांचा शव अंत्यदर्शनासाठी मलबार हिल येथील सैफी महल ठेवण्यात आले होते. कालपासून त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. रात्री २ वाजण्याच्या सुमारास गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.

दाऊदी बोहरा समाजातील महिला आणि पुरुषांमध्ये शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले कार्य महत्वाचे आहे. मुंबईसह देश आणि विदेशातून त्यांचे असंख्य चाहते या वेळी उपस्थित होते. दाऊदी बोहरा समाजात शिक्षणाचे महत्व त्यांनी रुजविले. सामाजिक सुधारणांवरही त्यांचा भर होता.

जागतिक पातळीवर विविध ठिकाणी दाऊदी बोहरा समाजाची प्रार्थना स्थळे, सांस्कृतिक केंद्रे उभारण्याच्या कामात त्यांचा पुढाकार होता. उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑष्ट्रेलिया आणि अन्य ठिकाणी ही प्रार्थनास्थळे आहेत.

दाऊदी बोहरा समाजातील लोकांच्या प्रबोधनासाठी गेली अनेक वर्षे त्यांनी सलग नऊ दिवसांची व्याख्याने देशासह परदेशातही विविध ठिकाणी दिली. मुंबई, सुरत यासह दुबई, कराची, ह्युष्टन, कोलंबो आदी ठिकाणांचा यात समावेश आहे. समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक न्यासाची स्थापना केली होती. या न्यासातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ जॉर्डन, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी, डॉक्टर ऑफ इस्लामिक सायन्स, टेक्सास विद्यापीठ, कराची विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी असे सन्मान त्यांना मिळाले होते. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलुगुरूपद त्यांनी भुषविले होते. लंडन येथील रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये व्याख्यान देण्याचा मानही त्यांना मिळाला होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 18, 2014, 08:18


comments powered by Disqus