कंत्राटदारांवर कारवाई पण... स्टँडिंग कमिटीत 'अंडरस्टँडिग'?, action on contractor by bmc

कंत्राटदारांवर कारवाई पण... स्टँडिंग कमिटीत 'अंडरस्टँडिग'?

कंत्राटदारांवर कारवाई पण... स्टँडिंग कमिटीत 'अंडरस्टँडिग'?
www.24taas.com, मुंबई

मुंबई महापालिकेच्या कामात कामचुकारपणा करणाऱ्या सहा कंत्राटदारांना पालिकेनं ब्लॅक लिस्टेड केलंय. तसंच मलनि:सारण कामाची खोटी बीलं देणाऱ्या १७ कंत्राटदाराची चौकशी सुरू करून यातील पाच कंत्राटदारांना पालिकेनं ताबडतोब `काम बंद`चे आदेश दिलेत. त्यामुळे या कंत्राटदारांना यापुढे पालिकेकडून काम देता येणार नाही.

मुंबई महापालिका शहरातली विकास कामं नोंदणी असलेल्या कंत्राटदारांनाच देते. पण, हेच कंत्राटदार कामं अर्धवट सोडतात किंवा कामं अर्धवट सोडून वाढीव रक्कमेसाठी अडून राहतात. या कामचुकार कंत्राटदारानी स्टॉमवॉटर, ड्रेनेज, फूटपाथ, शौचालय दुरूस्तीच्या कामात दोन कोटींचा भ्रष्टाचार केलाय. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या सहा कंत्राटदारांना महापालिकेनं ब्लॅक लिस्टेड केलंय. कनक कन्स्ट्रक्शन कंपनी, जगदंबा कन्स्ट्रक्शन कंपनी, पुष्कर इंजिनिअर्स, देव एंटरप्रायझेस, सूर्यपाल एंटरप्रायझेस आणि टायगर इंजिनिअर्स या कंत्राटदारांची काळ्या यादीत नोंद झालीय.

याचवेळी पालिकेनं मलनिःसारण कामाची खोटी बिलं देणाऱ्या १७ कंत्राटदारांची चौकशी सुरू केलीय. या कंत्राटदारांनी ७० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यापैकी जेटकीन एंटरप्रायजेस, मीरा कन्स्ट्रक्शन, एम. एम. व्ही. असोसिएशन, रतनसिंग अॅन्ड ब्रदर्स आणि चिराग इन्फ्रा प्रोजेक्टस या पाच कंत्राटदारांची कामं बंद करण्याचे आदेश दिलेत. पालिकेच्या स्टँडिंग कमिटीत अंडरस्टँडिग होत असल्यानं हेच कंत्राटदार नवीन चार कंपन्यांना कंत्राट मिळवून देतात. त्यामुळे पालिकेची ही कारवाई म्हणजे नौटंकी असल्याची टीका गो. रा. खैरनार यांनी केलीय. परंतू, खैरनार यांचे आरोप चुकीचे असल्याचं सांगत स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या आरोपांचं खंडन केलंय.

पालिकेनं कंत्राटदारावर कारवाईचा बडगा दाखवत कंत्राटदाराची साखळी मोडण्याचा प्रयत्न तर केलाय, पण कायमस्वरुपी पालिका अशी कठोर भूमिका घेणार का? आणि कंत्राटदारांवर खरंच कारवाई होणार का? यावर जनतेचीही नजर लागलीय.

First Published: Thursday, February 7, 2013, 09:24


comments powered by Disqus