Last Updated: Friday, April 11, 2014, 18:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आमदार विजय सावंत यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. राणेंविरोधातील भूमिकेबाबत तात्काळ खंडन करा आणि कामाला लागा अन्यथा कारवाई केली जाईल, असे दिलेल्या नोटीसमध्ये इशारा देण्यात आला आहे.
आमदार विजय सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसचा `घरचा आहेर` दिल्यानं राणेंची डोकेदुखी वाढली. राणेंनी सिंधुदुर्गातली काँग्रेस संपवली. आता जी अस्तित्वात आहे ती राणे समर्थक काँग्रेस आहे, असा तिखट हल्ला सावंत यांनी चढवला होता. त्यातच राष्ट्रवादीने राणेंविरोधात भूमिका घेतल्याने कोकणात काँग्रेसची लोकसभेची जागा धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
सिंधुदुर्गात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. राणे हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धूप घालीत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतला आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून वरिष्ठ पातळीवरून काम करण्याच्या सूचना करण्यात आल्यात. मात्र, कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राष्ट्रवादी पदाधिका-यांच्या राजीनाम्यानंतर, काँग्रेस नेते विजय सावंत यांनीही राणेंवर भडिमार केल्यानं, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नीलेश राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पक्षाने सावंत यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाय.
दरम्यान, परभणीतही राष्ट्रवादी उमेदवाराचा प्रचार करण्याची तंबी काँग्रेस आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना दिली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काँग्रेसचा विरोध असल्याने नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे पक्षाने प्रचार करा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
Against Rane role MLA Vijay Sawant Notice to the Congress party
First Published: Friday, April 11, 2014, 18:23