Last Updated: Wednesday, October 24, 2012, 10:58
www.24taas.com, मुंबईशिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आज सायंकाळी धडाडणार आहे. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ‘फटकारे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मध्यंतरीच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या काळात राज ठाकरे त्यांच्या जवळ गेले. या पार्श्व्भूमीवर बाळासाहेब राज यांच्याविषयी काय बोलतात, हा देखील औत्सुक्याचा विषय असेल. सायंकाळी ६ वाजता दसरा मेळाव्याला सुरुवात होईल.
या मेळाव्यात सध्याची राजकीय परिस्थिती, भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उठलेले वादळ, मित्रपक्ष भाजपा, शिवसेनेची पुढची वाटचाल आणि राज ठाकरेंवर शिवसेनाप्रमुख काय बोलतात, याविषयी शिवसेना कार्यकर्त्यांची उत्सुकता आहे.
शिवसेनाप्रमुखांची दुर्मिळ आणि निवडक व्यंगचित्रे असलेले हे पुस्तक मुखपृष्ठावरील वाघनखांच्या ओरखड्यांनी अधिकच आकर्षक बनले आहे. तब्बल अडीचशे पानांचे हे पुस्तक आहे. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार असलेल्या शिवसेनाप्रमुखांची एकत्रितपणे एवढी व्यंगचित्रे एखाद्या पुस्तकात समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये काढलेल्या व्यंगचित्रांपासून ‘सामना’साठी काढलेल्या व्यंगचित्रांपर्यंत शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेली व्यंगचित्रे पुस्तकात आहेत. ‘फटकारे’ या पुस्तकाच्या विक्रीसाठी शिवतीर्थाजवळ आठ ठिकाणी विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत.
First Published: Wednesday, October 24, 2012, 10:58