Last Updated: Saturday, November 23, 2013, 20:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्क परिसरातच होईल, अन्य कुठेही नाही अशी भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आलीय. ‘सीआरझेड’मुळे महापौर निवासावर स्मारक उभारण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडाचा पर्याय समोर आलाय. त्यावर शिवसेना सावध झालीय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यासाठी दादर बाहेर अन्य जागांचा पर्याय म्हणून विचार सुरु झाल्यानं शिवसेना वेळीच सावध झालीय. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पुढाकार घेतल्यानंतर वेगानं हालचाली सुरु झाल्या. दादरमधल्या शिवाजी पार्कातील महापौर निवास, पार्क क्लब, महापालिका क्रिड़ाभवन अशा जागांचे पर्याय स्मारकासाठी पुढे आलेत. पवार यांनी महापौर निवास आणि पार्क क्लबच्या जागांची पाहाणी केली. मात्र हरिटेज, सीआरझेडमुळे स्मारकाला परवानगी मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता पाहाता वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स मधील तीन एकराचा भूखंड एमएमआरडीएकडे मागण्यात आल्याची माहिती मिळतेय. ज्याला शिवसेनेनं विरोध दर्शवलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्क परिसरातच होईल, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नाही, अशी भूमिका पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलीय. असंख्य नियमांच्या अडथळ्यातून मार्ग काढत शिवाजी पार्कमध्ये शिवसेनाप्रमुखांचं स्मृती स्थळ उभारण्यात महापालिकेतील शिवसेना नेते यशस्वी ठरलेत. आता कसोटी पक्षातील नेत्यांची आहे. महापालिकेतील नेत्यांनी तर करुन दाखवलंय, आता पक्षाचे नेते काय करतात याकडे लक्ष असणार आहे.
वर्षभरात शिवसेनाप्रमुखांचं स्मारक उभं राहत नसल्याबद्दल शिवसैनिक आणि ठाकरे कुटुंबातील सदस्यांकडूनच रोष व्यक्त होतोय. त्यामुळे स्मारकासाठी पवारांचा पुढाकार असला तरी ते मूळ जागेपासून भरकटू नये, याची संपूर्ण जबाबदारी शिवसेना नेत्यांवरच असणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 23, 2013, 20:23