आज बेळगाव विधानभवनाचं उद्घाटन... , Belgaum assembly function

आज बेळगाव विधानभवनाचं उद्घाटन... विरोध शिगेला

आज बेळगाव विधानभवनाचं उद्घाटन... विरोध शिगेला
www.24taas.com, मुंबई
कर्नाटक सरकारनं बेळगावात बांधलेल्या विधानभवनाचं आज उदघाटन होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. मात्र, या उदघाटन कार्यक्रमास राष्ट्रपतींनी येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीबरोबर शिवसेनेनंही केलीय.

बेळगावात विधानभवन बांधल्यानं सीमाभागातील मराठी बांधवांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय. गेल्या ५६ वर्षांपासून सीमाबांधव बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा. यासाठी आंदोलन करतोय. परंतू, कर्नाटक सरकारनं बेळगावमध्येच विधानभवन बांधून एकप्रकारे सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांनी मुंबईत मलबार हिल पोलीस ठाण्यातच उपोषण सुरू केलंय. राष्ट्रपतींनी बेळगाव विधानभवनाच्या उदघाटानाला जाऊ नये, यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

दुसरीकडे शिवसेनाही या प्रश्नावर आक्रमक झाली असून शिवसेनेनं आज पश्चिम महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. याआधी बेळगावातल्या विधानभवनाचं उदघाटन राष्ट्रपतींनी करु नये, अशी मागणी शिवसेनेनं केली होती. त्याचबरोबर छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यासंदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं.

First Published: Thursday, October 11, 2012, 09:06


comments powered by Disqus