`एकही जागा नाही आणि म्हणे मर्दानी संघटना...`, bhaskar jadhav on thackeray & shivsena

`एकही जागा नाही आणि म्हणे मर्दानी संघटना...`

`एकही जागा नाही आणि म्हणे मर्दानी संघटना...`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एकेकाळचे शिवसैनिक आणि सध्याचे राष्ट्रवादीचे खंदे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची नक्कल करत शिवसेनेला डिवचलंय. निमित्त होतं गुहागरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...

अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात जाधवांनी आदित्य यांचा उल्लेख वासरु असा करत, त्यांच्या आवाजाची नक्कल केली तर उद्धव ठाकरेंवरही त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली. उद्धव ठाकरे अनेक वेळा आपल्या भाषणात ‘मर्द’ हा शब्द वापरतात त्यावरच जाधवांनी व्यंग साधलंय. आदित्य ठाकरे यांचं नाव घेत ‘ज्यांच्या आवाजामध्ये दम नाही, तो काय नेतृत्व करणार... आणि म्हणे युवा सेनेचा नेता...’ असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली. त्यानंतर ते उद्धव ठाकरेंकडेही वळले. ‘उद्धव ठाकरे उभे राहिले तर त्यांचा हात वर करण्यासाठी निलम गोऱ्हे असतात... पाहा... त्यांचा फोटो....’ असं म्हणत उद्धव ठाकरेंवरही त्यांनी वैयक्तिक टीका केली.

यानंतर भास्कर जाधव यांनी शिवसेनेला टार्गेट करत ‘नगरपालिकेत एकही जागा नाही आणि म्हणे मर्दानी संघटना... त्या पक्षात राहून तुम्हाला राजकीय भवितव्य काय? विकासकामांसाठी नेतृत्व नाही... विचार नाही... अशा संघटनांमध्ये पडून राहण्यापेक्षा राष्ट्रवादीमध्ये या’ असं आवाहन भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमोना साद घालण्याचा प्रयत्न केला.

आता यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना जाधवांना उत्तर कसं देणार, याकडे सगळ्याचं लक्ष आहे. तसचं हा वाद चिघळणार का, अशी चर्चाही सुरु झालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 30, 2013, 13:28


comments powered by Disqus