Last Updated: Saturday, October 20, 2012, 19:03
www.24taas.com,मुंबईपाटण्यातील बिहारी नेत्यांना एखादी ‘छटपूजा’ घालायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नर्मदेच्या तीरी जरूर घालावी. कारण मोदी यांनी आधीच वेगळी छटपूजा घातलेली दिसते, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राचा अग्रलेखात म्हटले आहे. त्यामुळे मोदींच्या बिहारविरोधाची बाळासाहेब ठाकरेंकडून प्रशंसा झाल्याचे दिसून येत आहे.
भारतातील गलिच्छ आणि गटारी राजकारण जगात कुठे असेल असे वाटत नाही. भाषा, प्रांत, जात, धर्म यांचा नुसता चिखल माजला आहे व त्या चिखलात लोळणारे रेडे ‘राष्ट्रीय एकात्मता’ वगैरेंच्या नावाने बेसूर हंबरडे फोडीत असतात. विधानसभेत निवडणुकांच्या निमित्ताने सध्या गुजरात विरुद्ध बिहार असा ‘फू बाई फू’चा सामना रंगला आहे, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे की, ‘एकही बिहारी बाबू प्रचारादरम्यान गुजरातमध्ये चालणार नाही!’ मोदी यांचा हा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांना आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांना आपल्या राज्यात येण्यापासून रोखले होते. याचा समाचार आता मोदीनी घेतला आहे. ते योग्यच आहे, असा सूर ठाकरे यांनी घेतला आहे.
बिहारात जनता दल युनायटेड व भाजपचे ‘युती सरकार’ आहे. युतीच्या पोस्टर्सवरील मोदींचे चित्रही त्यांनी काढायला लावले होते. मोदी बिहारात आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व जनता दल (युनायटेड)ला मिळणार्याय मुसलमानी मतांत घाटा होऊ शकतो असे गणित नितीशकुमार यांनी मांडले. त्याही पुढे जाऊन नितीशकुमार यांनी असे जाहीर केले की, मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर भाजपशी ‘तलाक’ करायला आपण मागेपुढे पाहणार नाही. थोडक्यात काय? तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दोन मुख्यमंत्र्यांचा हा राजकीय झगडा आहे व त्यांना आवरण्याची क्षमता आता कोणात नाही. नितीशकुमार यांनी जो हल्ला केला त्यावर मोदी यांनी आता प्रतिहल्ला चढवला. गुजरात निवडणुकांच्या प्रचारात नितीशकुमार, शरद यादवांसारखे नेते नकोच. पण स्वपक्षातील ‘बिहारी’ नेत्यांवरही मोदी यांनी कट मारून बिहारविरुद्धच रणशिंग फुंकले आहे, असे ठाकरे यांनी नमुद केले आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी, शाहनवाज हुसेन या बिहारी नेत्यांना गुजरातच्या प्रचार यादीतून वगळून मोदी यांनी नितीशकुमार यांच्यासह बिहारलाच डिवचले आहे. हे सर्व जर महाराष्ट्रात घडले असते तर सर्वच बिहारी नेत्यांनी हा बिहारच्या अस्मिता व स्वाभिमानाचा प्रश्नस असल्याचे सांगून राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाने धांगडधिंगा घातला असता. मुंबईत जे बिहारी पादरे पावटे आहेत त्यांनीही नसलेल्या अस्मितेच्या फुसकुल्या सोडून महाराष्ट्राच्या राजधानीत आधीच केलेल्या दुर्गंधीत भर टाकली असती. रामविलास पासवान, लालू यादवांसारख्या फेकूचंद पुढार्यांेनी दिल्लीत बसून ‘महाराष्ट्रात येऊन दाखवतोच’ अशा पोकळ धमक्या दिल्या असत्या. या सगळ्यांची ‘बिहारी अस्मिता’ व ‘राष्ट्रीय एकात्मता’ फक्त महाराष्ट्राच्या बाबतीच टांग वर करते व इतर वेळी ती शेपूट आत घालते, असा खडा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
आज तरी परिस्थिती अशी आहे की, मोदी म्हणजेच गुजरात, मोदी म्हणजेच गुजरातमधील भाजप. त्यामुळे नितीशकुमार, शरद यादव किंवा भाजपातील इतर बिहारी नेतेच काय, बिहारमधील मुंगी व पाखरूही मोदींच्या परवानगीशिवाय गुजरातमध्ये प्रवेश करू शकणार नाही. यावर मुंबई, पाटण्यातील बिहारी नेत्यांना एखादी ‘छटपूजा’ घालायची असेल तर त्यांनी मोदी यांच्या गुजरातेत नर्मदेच्या तीरी जरूर घालावी, असे प्रति आव्हान ठाकरे यांनी बिहारी नेत्यांना दिले आहे.
First Published: Saturday, October 20, 2012, 18:55