महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर! BMC sweeper on the tour of South Africa

महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर!

महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

इच्छाशक्तीच्या बळावर मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलाय. चतुर्थश्रेणी कर्मचारी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील विद्यापिठात अभ्यासाठी जात असल्याची ही पहिली वेळ आहे. पण मुंबई महापालिकेला त्याचं फारसं अप्रूप नसल्याचं दिसतंय.

हे सफाई कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवतात. म्हणून तर आपण मुंबईकर किमान आरोग्यदायी जीवन जगू शकतो. पण दिवसरात्र घाण उपसणाऱ्या या कर्मचाऱ्यांचं जीणं मात्र अजूनही किड्या-मुंग्यांसारखंच. यातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव सुनील यादव या सफाई कर्मचाऱ्याला आणि त्यानं मागं वळून पाहिलं नाही.

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर सफाई कर्मचारी म्हणून लागलेला सुनिल दहावी नापास होता. नोकरी सांभाळत मुक्त विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये प्रवेश घेतला. इथं त्याला एक्सचेंज प्रोग्रामअंतर्गत द. आफ्रिकेत जाण्यासाठी संधी आली. पण बीएमसी प्रशासनानं स्टडी लिव्ह देण्यास टाळाटाळ केली.

पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच चतुर्थश्रेणीतील एक कर्मचारी स्टडी लिव्ह मागत होता आणि वरिष्ठ अधिकारी काही केल्या मागणी पूर्ण करत नव्हते. एका इंग्रजी वृत्तपत्रात यासंदर्भातील बातमी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पाहिली आणि दिल्लीतून सुत्र हलली.
एससी, एसटी कमिशनचे उपाध्यक्ष स्वत: मुंबईत आले आणि बीएमसी प्रशासनाचे कान पिळले. यानंतर सुनिलला न्याय मिळाला.

जोहान्सबर्ग इथल्या विट वाँटर रँण्ड विद्यापीठात मुंबई आणि जोहान्सबर्ग इथल्या खाजगी सुरक्षा रक्षकांचा तुलनात्मक अभ्यास सुनिल करणार आहे. तीन महिन्यांच्या या अभ्यास दौऱ्यासाठी सुनिल रवाना झाला असून यासाठी त्याला त्याच्या शिक्षकाचं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय.

सुनिल इतर सफाई कर्मचाऱ्यांसाठी रोल मॉडेल बनला असून अनेक कर्मचारी आता मुक्त विद्यापिठातून शिक्षण घेवू लागलेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Sunday, October 6, 2013, 20:57


comments powered by Disqus