Last Updated: Tuesday, November 6, 2012, 16:50
www.24taas.com,मुंबई बिल्डरांकडून मनमानीपणे व्हॅटची वसुली सुरू असून या व्हॅट वसुलीमुळे धास्तावलेल्या ग्राहकांच्या मदतीला आता www.flatvat.com ही वेबसाइट धावून आली आहे. व्हॅटचे पैसे परत कसे मिळवायचे याबाबचा सल्ला मिळू शकणार आहे.
स्थावर मालमत्तेवर व्हॅट लागत नसल्याने व्हॅट भरू नये वा व्हॅट भरला असेल तर तो परत मिळविण्यासाठी काय करावे, याबाबत मार्गदर्शन आणि मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या निर्णयाची माहिती पुरवित www.flatvat.com या वेबसाइटद्वारे जनजागृती केली जात आहे.
कांदिवलीत राहणारे शरद पटेल हे चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून काम करीत आहेत. त्यांनी व्हॅटचा तिढा लक्षात घेत त्याचा अभ्यास केला. त्याचबरोबर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आतापर्यंतच्या सर्व निर्णयाचाही बारकाईने अभ्यास केला. त्यावरून स्थावर मालमत्तेवर अर्थात गृहविक्रीवर व्हॅट लागू होतो हे कुठेही अद्यापपर्यंत नमूद करण्यात आलेले नाही. सध्या होणारी व्हॅट वसुली ही बेकायदेशीर आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
घर घेताना जिथे स्थावर मालमत्ता असल्याचे म्हणत राज्य सरकार स्टॅम्प ड्युटी आणि विक्रीकर आकारते तर दुसरीकडे स्थावर मालमत्ता नाही असे म्हणत व्हॅट आकारणे म्हणजे बेकायदेशीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक होत असून राज्य सरकारही व्हॅटच्या धोरणाबाबत स्पष्ट नसल्याने ग्राहकांनीच एकत्र येऊन आंदोलन सुरू करण्याची गरज असल्याने त्यांनी हे इंटरनेटचे माध्यम वापरले आहे.
पटेल यांनी तीन मित्रांच्या बरोबरीने सोमवारी २९ ऑक्टोबर रोजी ‘फ्लॅटव्हॅट’ नावाची वेबसाइट सुरू केली. या बेबसाईला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी नोंदणीसाठी साईला भेट देत आहेत.
पटेल यांनी व्हॅटने त्रासलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. चारच दिवसांत वेबसाइटवर ३५० ग्राहकांनी नोंदणी केली आहे. यात व्हॅट भरलेले आणि अद्याप व्हॅट न भरलेले अशा दोन्ही ग्राहकांचा समावेश आहे.
या ग्राहकांनी मांडलेल्या समस्यांचे एक निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात येणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
First Published: Tuesday, November 6, 2012, 16:43