मुंबईकरांनो डोळ्यांची काळजी घ्या!, conjunctivitis eye problem in mumbai

मुंबईकरांनो डोळ्यांची काळजी घ्या!

मुंबईकरांनो डोळ्यांची काळजी घ्या!
www.24tass.com, झी मीडिया, मुंबई

पावसाळा त्यात साथीच्या रोगांची लागण, हे समीकरण काही नवं नाही. पण मुंबईकरांनो सध्या सावध राहा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. कारण मुंबईत डोळ्यांची साथ सुरू आहे. महापालिका आणि सरकारी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये सध्या डोळे आलेल्या रुग्णांची संख्या जास्त आढळून येतेय. या आजारापासून सावध राहा आणि वेळीच उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.

दूषित पाणी डोळ्याला लागून व्हायरल इन्फेक्शननं हा आजार होतो. मात्र हा आजार जास्त पसरतो एका रुग्णाकडून दुसऱ्याकडे त्याचा संसर्ग झाल्यानं. त्यामुळंच डोळे आल्यास इतरांना आपला संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय जे. जे. रुग्णालयाचे डीन आणि ज्येष्ठ नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांनी. डॉक्टर लहाने यांनाही एका दीड वर्षाच्या मुलाची तपासणी करताना डोळ्याचा संसर्ग झाला.

मुंबईतल्या केईएम, शीव, नायर, सर जे. जे. या रुग्णालयांप्रमाणंच उपनगरांतील रुग्णालये तसंच खासगी डॉक्टरांकडेही डोळे आलेल्या रुग्णांची संख्या वाढतेय. गेल्या आठवड्यापासून रोज किमान दहा रुग्ण या आजारावर उपचारासाठी आले, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे नेत्रशल्यविशारद डॉ. अर्जुन आहुजा यांनी दिली. आपले डोळे आलेत हे समजण्यासाठीचे लक्षणं म्हणजे डोळे लाल होणं, डोळ्यातून सतत पाणी येणं आणि पापण्यांना सूज येणं ही आहेत.

त्यामुळं आपल्या डोळ्याची काळजी घेत डोळे आलेल्या रुग्णाशी अधिक संपर्क टाळावा. त्यानं हाताळलेल्या वस्तूंना स्पर्शही करु नये, डोळे आल्यास ते चोळू नये. डोळे दिवसातून तीन वेळा थंड पाण्यानं धुवावेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 2, 2013, 12:39


comments powered by Disqus