मुंबईतील घटना..अंत्ययात्रेची तयारी अन् मृत रूग्ण जिवंत,Dead patient alive, Doctor Arrested in Mumbai

मुंबईतील वास्तववादी घटना...अंत्ययात्रेची तयारी अन् मृत रूग्ण जिवंत

मुंबईतील वास्तववादी घटना...अंत्ययात्रेची तयारी अन् मृत रूग्ण जिवंत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आजच्या २१ शतकातील वास्तवादी घटना मुंबईत घडली. अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तुमच्या सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार या रूग्णाच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रेची तयारी सुरू केली. मात्र, हा रूग्ण जिवंत झाला.

ही घटना काल्पनिक नाही. तर ती आहे मुंबईतील शीव येथील एका खासगी रुग्णालयातील. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. धारावीच्या पालिका वसाहतीत राहणारे चंद्रकांत गांगुर्डे (५५) यांना गेल्या गुरूवारी अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना शीव येथील अथर्व हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गांगुर्डे यांच्या मेंदूत रक्त साकळल्याचे कारण देत त्यांच्यावर न्युरोसर्जनमार्फत उपचार सुरू होते. मंगळवारी संध्याकाळी डॉक्टर अतुल चिरमाडे यांनी गागुंर्डे यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले. नंतर रात्री गांगुर्डे यांच्या मुलांना बोलावून त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. मृतदेह भायखळा येथे किंवा शीव येथे घेऊन जा, असे डॉ. चिरमाडे यांनी सांगितले होते.

मात्र, मुलाने एका रात्रीपुरता वडिलांचा मृतदेह रुग्णालयातच ठेवा, अशी विनंती केली. त्यानुसार त्यांचा देह रूग्णालयात ठेवण्यात आला. गांगुर्डे यांच्या निधनाच्या वृत्तामुळे त्यांचे सर्व नातेवाईक मुंबईला आले आणि अंत्ययात्रेची तयारीही सुरू करण्यात आली. धारावीत त्यांच्या निधनाचे फलकही लावण्यात आले होते.

दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी जेव्हा गांगुर्डे यांची मुले रुग्णालयात गेली तेव्हा त्यांना वडिलांच्या शरीराची हालचाल सुरू असल्याचे दिसले. कृत्रिम श्वसनयंत्रणा काढल्यानंतर अर्धा तास हालचाल असते, असे सुरूवातीला डॉक्टरांनी सांगितले. मात्र गांगुर्डे यांचा श्वास सुरू होता, तसेच ते जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्वरित त्यांना सलाईन देऊन पुढील उपचार करण्यात आले. गांगुर्डे यांना दुसऱ्या रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी शीव पोलीस ठाण्यात चिरमाडे यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉ. चिरमाडे यांनी माझ्याकडून कोऱ्या कागदावर सही घेतल्याचे गांगुर्डे यांचा मुलगा अण्णासाहेब याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 12, 2013, 13:19


comments powered by Disqus