Last Updated: Wednesday, December 12, 2012, 16:55
www.24taas.com, मुंबई मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मनसेला मैदान नाकारल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही न्यायालयावर टीका केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र राज ठाकरें विरोधात दाखल झालेली अवमान याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
न्यायमूर्ती डी. डी. सिन्हा व न्यायमूर्ती के. के. ताथेड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पण, सुनावणीसाठी याचिकाकर्तेच उपस्थित न झाल्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी शिवाजी पार्क येथे सभा घेण्यास न्यायालयाने ठाकरे यांना मनाई केली होती. न्यायालयाच्या निर्णयाबद्दल त्यांनी कथित अवमानकारक शब्द वापरले.
ठाकरे वारंवार अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत अँड. सय्यद अब्बास इजाज नक्वी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. पण, सुनावणीदरम्यान ते उपस्थित राहिले नाहीत.
First Published: Wednesday, December 12, 2012, 16:45