Last Updated: Thursday, December 19, 2013, 21:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉम्बे रुग्णालयाच्या बाथरूममध्ये दडून शिकाऊ महिला डॉक्टरांच्या व्हिडीओ क्लिप काढणाऱ्या डॉक्टरला आझाद मैदान पोलिसांनी गजाआड केले. यश शहा असे या डॉक्टरचे नाव असून, तो बॉम्बे रुग्णालयात ऑर्थोपेडिक्स विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
रुग्णालयाच्या आवारातील वसतिगृहात राहणाऱ्यात यशचे हे पराक्रम बाथरूममध्ये गेलेल्या एका महिलेनेच पकडले आणि तत्काळ याबाबतची तक्रार रुग्णालय अधिकाऱ्याकडे केली. तेथून ही तक्रार आझाद मैदान पोलीस ठाण्यात आली.
मुलामुलींची वसतिगृहे एकाच मजल्यावर आहेत. याच मजल्यावर बाजूबाजूला मुलामुलींचे बाथरूम, शौचालयेही आहेत. डॉ. शहा हा मुली बाथरूममध्ये गेल्यावर मध्ये असलेल्या रिकाम्या जागेत लपून त्यांचे व्हिडीओ काढायचा. गेल्या काही दिवसांपासून त्याचे हे कृत्य सुरू होते.
मंगळवारी एक महिला डॉक्टर बाथरूममध्ये गेली असताना कोणीतरी बाहेर असल्याची चाहूल तिला लागली. म्हणून त्या व्यक्तीला कळू न देता ती बाहेर आली. या वेळी डॉ. शहा तिथे दिसला आणि तो अशाप्रकारे व्हिडीओ काढत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी डॉक्टरच्या मुसक्या रात्री अकराच्या सुमारास आवळल्या.
त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. पोलिसांनी त्याचा मोबाइल पुढील तपासासाठी ताब्यात घेतला आहे. ही बाब अतिशय नाजूक आणि गोपनीय आहे. पोलीस या गोष्टीचा तपास करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यावर खरे काय आहे, हे समजेल. आता काहीच सांगता येणार नाही, असे बॉम्बे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 19, 2013, 21:06