Last Updated: Thursday, September 13, 2012, 13:27
www.24taas.com, मुंबई भारताचा माजी कसोटीपटू नयन मोंगिया याच्याविरोधात दाखल असलेली घरगुती छळासंदर्भातला खटला कायम ठेवण्यात आलाय. बोरिवली कोर्टानं हा निर्णय दिलाय. मोंगियाच्या आईनं त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.
माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा एकेकाळचा विकेटकीपर नयन मोंगिया बोरिवली कोर्टाच्या या निर्णयामुळे चांगलाच अडचणीत सापडलाय. मोंगियाची ६२ वर्षीय आई ज्ञानदेवी यांनी आपल्या मुलावर घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. ज्ञानदेवी या गुजरातच्या वडोदरामध्ये राहत होत्या. २०११ साली त्या मुंबईत स्थायिक झाल्या. ज्ञानदेवी यांनी आपल्या पतीच्या संपत्तीतील हिस्सा आपल्या मुलाला देण्यास नकार दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पतीनं म्हणजेच मोंगियाच्या वडिलांनी त्यांची सर्व संपत्ती ज्ञानदेवींच्या नावावर केली होती.
ज्ञानदेवी यांनी मोंगियावर दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराचा खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी मोंगियानं बोरिवली कोर्टाला केली होती. ‘मी स्वत: आणि माझी आई वडोदराचे रहिवासी आहोत, त्यामुळे मुंबईत केस चालवण्यात येऊ नये’ असं कारण यावेळी मोंगियानं पुढं केलं होतं. पण कोर्टानं मात्र त्याची ही मागणी फेटाळलीय. त्यामुळे त्याच्यावरचा घरगुती हिंसाचाराचा खटला पुढे सुरु राहणार आहे.
First Published: Thursday, September 13, 2012, 13:16